इंदापूर – बावडा (ता. इंदापूर) परिसरातील बेकायदा हातभट्टी दारू अड्ड्यावर बावडा दूरक्षेत्र पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 28000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 9) सकाळी सहा वाजता केल्याने बेकायदा हातभट्टी दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस ठाणे अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील बावडा येथे बेकायदा हातभट्टी दारू धंदे सुरू असल्याची गोपनीय माहिती गोपनीय माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना प्राप्त होताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व त्यांच्या पथकाने सकाळीच ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर म्हणाले की, बावडा परिसरामध्ये अवैध हातभट्टी दारू विक्री होत असल्याचे कळाले,
त्यामुळे या घटनेला पायबंध ठोस घालण्यासाठी पोलिसांचे पथक करून रसायनाने, भरलेले 300 लिटरचे बॅरल 5 नग, 200 लिटर 12 नग, 100 लिटर 1 नग व इतर साहित्य असा एकूण 2 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून केल्याचे त्यांनी नमूद केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहायक निरीक्षक नागनाथ पाटील,
सहायक फौजदार के. बी. शिंदे, युवराज कदम, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस हवलदार मनोज गायकवाड, पोलीस नाईक सलमान खान, अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, महिला पोलीस नाईक मुजावर, पोलीस शिपाई विकास राखुंडे, दिनेश चोरमले आदींनी केली आहे.