पुणे -पुणे-दौंड डेमूला (लोकल) गेल्या काही दिवसांपासून वारंवार उशीर होत आहे. यातच आता सोलापूर-पुणे डेमू ही पुणे स्थानकापर्यंत न धावता हडपसर स्थानकापर्यंत धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. तेव्हा रेल्वे प्रशासनाने हा निर्णय रद्द करावा, अन्यथा शिवाजीनगर स्थानकावरून सुटणारी लोकल हडपसर स्थानकावरून सुरू करण्यात यावी आदी मागण्याचे निवेदन पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपच्या वतीने डीआरएम इंदू दुबे यांना देण्यात आले.
दौंड ते पुणे कामानिमित्ताने हजारो चाकरमानी दररोज लोकलने प्रवास करतात. त्यामुळे ग्रामीण भागातून दररोज मोठ्याप्रमाणात नागरिक पुण्यात येतात. पुण्यापर्यंत थेट लोकल असल्याने नागरिकांना लोकल सेवा सोयीस्कर आहे. पण, रेल्वे प्रशासनाने 6 मार्च पासून पुणे-सोलापूर- पुणे दरम्यान धावणाऱ्या डेमूचे ओरीजनेटिंग व टर्मिनेटिंग स्थानकात बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे.
हा निर्णय रद्द करून पुण्यावरूनच रेल्वे सोडण्यात यावी. तसेच लोणावळा लोकल शिवाजीनगर येथून न सोडता हडपसर स्थानकावरून सोडण्यात याव्यात. अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी पुणे ग्रामीण प्रवासी ग्रुपचे अध्यक्ष फारुख बागवान, कार्याध्यक्ष प्रमोद उबाळे, अक्षय खेडेकर, सागर शेळके, संतोष कांचन आदी उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनाने लोकल बंद करून येथून डेमू सोडण्याचा निर्णय घेतला आहे. डेमूला एक्स्प्रेसचा दर्जा दिल्याने तिकीट दर 10 रुपयांवरून 30 रुपये केले आहेत. पण, ही डेमू सर्व स्थानकांवर थांबत असल्याने रेल्वे प्रशासनाने तिकीट दर वाढवून नागरिकांची लूट सुरू केली आहे.
– प्रमोद उबाळे, कार्याध्यक्ष, पुणे ग्रामीण प्रवासी ग्रुप