शिक्रापूर -शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौक येथे पुणे- नगर महामार्गावर एका मद्यधुंद कारचालकाने एका कारसह दोन दुचाकींना धडक देऊन तीन वाहनांचे नुकसान केले. दोनजण जखमी झाले. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संभाजी गायकवाड या कारचालकावर गुन्हे दाखल केले. शिक्रापूर येथील नगर महामार्गावरुन अनिल औटी हे त्यांची कार घेऊन पुणे बाजूकडे चाललेले होते. नगर बाजूने मद्यधुंद अवस्थेत आलेल्या कारचालकाने औटी यांच्या कारला धडक घेऊन पुढे चाललेल्या दोन दुचाकींना धडक देऊन भरधाव वेगाने निघून गेला. यावेळी दोन्ही दुचाकीवरील महेंद्रसिंग राजपूत व जयश्री दौंडकर हे दोघे जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्याने हवालदार सहदेव ठुबे, गणेश शेंडे, बापू हदागळे, मिलिंद देवरे, ज्ञानदेव गोरे, ट्राफिक वॉर्डन अमोल राऊत, अनिल वाडेकर यांनी कारचालकाला चाकण चौक येथे अडवून ताब्यात घेतले. तो मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अपघातात अनिल औटी यांच्या कारसह मद्यधुंद कार चालकाच्या कार व दोन दुचाकींचे मोठे नुकसान होऊन महेंद्रसिंग राजपूत, जयश्री दौंडकर हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत अनिल भाऊसाहेब औटी (रा. चऱ्होली, ता. हवेली) यांनी यांनी फिर्याद दिली आहे.