इंदापूर – सहकारी साखर उद्योगाच्या मदतीसाठी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सतत पाठपुरावा सुरू असतो. त्याचा संदर्भ घेऊन पुण्यामध्ये शनिवारी (दि. 18) आयोजित सहकार परिषदेमध्ये भाषणात अमित शहा यांनी “हर्षवर्धन नेहमी माझे डोके खातात’ असा आपुलकीने उल्लेख करीत हर्षवर्धन पाटील यांचे कौतुक केले.
हर्षवर्धन पाटील हे इथेनॉल प्रकल्पांसाठी कर्ज मिळत नाही, एन.सी.डी.सी.कडून साखर उद्योगाला अटी शिथिल करून कर्ज मिळाले पाहिजे आदी मागण्यांसाठी माझे डोके खातात, या शब्दांत अमित शहा यांनी विनोदी शैलीमध्ये हर्षवर्धन पाटील यांची फिरकी घेत साखर उद्योगाला सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे स्पष्ट केले.
सहकारी साखर उद्योगासाठी एन.सी.डी.सी.कडून थेट महाराष्ट्र सरकार मार्फत कर्ज दिले जाईल, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून अटींमध्ये शिथिल करून साखर उद्योगाला कर्ज दिले जाईल, तेल कंपन्यांकडून इथेनॉलचे पैसे कारखान्यांना कर्ज देणाऱ्या बॅंकांच्या खात्यात जमा केले जातील, त्यामुळे कारखान्यांना इथेनॉलपासून उत्पन्न मिळेल. तसेच इथेनॉलवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आल्याने साखर उद्योगाला फायदा होणार असल्याचे अमित शहा यांनी नमूद केले.
साखर उद्योगाला चालना मिळावी…
राज्यात भाजप सत्तेवर नसतानादेखील हर्षवर्धन पाटील यांनी थेट केंद्रीय स्तरावर संपर्क ठेवून, अनेक साखर धंद्याच्या प्रश्नांची सोडवणूक केली. सद्यःस्थितीत तर भाजप सत्तेवर असल्यामुळे इंदापूर तालुक्यासह राज्यातील साखर उद्योगाला चालना मिळावी, यासाठी अधिकचे प्रयत्न करण्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.