पुणे – स्वयंपाक घरातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे जिरे. कोणताही पदार्थ स्वादिष्ट बनविण्यासाठी तसेच फोडणीसाठी खास करून जिऱ्याला महत्व आहे. याच जिऱ्याचे भाव आता कडाडले आहेत. दीड महिन्यांपूर्वी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात जिऱ्याचे भाव 260 रुपये किलो होते. ते आता 370 रुपये झाल्याची माहिती व्यापारी रमेश पटेल यांनी दिली.
गुजरात, राजस्थान येथे जिऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणत घेतले जाते. तेथून संपूर्ण देशात जिऱ्याची निर्यात होत असते. यंदा मात्र, बदलत्या हवामानाचा फटका जिऱ्याच्या पिकाला बसला आहे. त्यामुळे उत्पादन घटले आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत कमी आवक होत आहे. त्यामुळे जिऱ्याचे भाव दीड महिन्यांत 50 टक्क्यांहून अधिक वाढले आहे.
मागील वर्षीचा विचार केल्यास यंदा भावात सुमारे 60 ते 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही उच्चांकी वाढ आहे. पुढील काही दिवसांत भावात आणखी वाढण्याची शक्यता आहे. वर्षभर जिऱ्याचे भाव चढेच राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सामान्यांना यंदा वरणाची व मसाल्यांची फोडणी महागात पडणार आहे.