बारामती – तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. 18) शांततेत मतदान पार पडले. ग्रामपंचायत निवडणुकीत मतांचा टक्का वाढला असून तालुक्यात सरासरी 83.66 टक्के मतदान झाले. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, गडदरवाडी व सोरटेवाडी ग्रामपंचायतसाठी मतदान प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली. यामध्ये मताचा टक्का वाढला असला तरी याचा नक्की फायदा कोणाला होणार? हे मंगळवारी मतमोजणी नंतरच समजणार आहे.
मुरूम ग्रामपंचायतसाठी 85.54 टक्के मतदान झाले. एकूण 4 हजार 700 मतदानापैकी 3 हजार 800 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. याठिकाणी सरपंचपदासाठी 2 तर 13 सदस्यांसाठी 27 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
वाणेवाडी येथे 80.73 टक्के मतदान झाले असून 4 हजार 629 पैकी 3 हजार 337 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. चार सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून सरपंचपदासाठी 2 तर 13 सदस्यपदासाठी 19 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
वाघळवाडीसाठी 80.17 टक्के मतदान पार पडले असून 3 हजार 51 मतदारांपैकी 2 हजार 441 मायदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. सरपंचपदासाठी 5 तर 13 सदस्यपदासाठी 35 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. गडदरवाडी येथे 90 टक्के मतदान पार पडले असून 1 हजार 113 पैकी 909 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला.
याठिकाणी 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून सरपंच पदासाठी 3 तर 6 सदस्यपदासाठी 15 उमेदवार उभे आहेत. सोरटेवाडी 79 टक्के मतदान झाले असून तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. सरपंचपदासाठी 2 तर 6 सदस्यपदासाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
ग्रामपंचायत कऱ्हाटी 85.70 टक्के मतदानाची नोंद झाली. पळशी (92.22), मासाळवाडी ( 91.01) लोणी भापकर (83.54), मोरगाव (74.72), कुरणेवाडी (92.31) सोनकस वाडी (92.86), वानेवाडी (80.71) पणदरे (83.28).