आशिया क्रीडा स्पर्धेतील विजेती ऋतुजा भोसले हिच्या भावना : पुनीत बालन ग्रुपकडून सत्कार
पुणे – आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर आपले राष्ट्रगीत आणि तिरंगा परदेशात फडकवण्यात आला. तो माझ्यासाठी आयुष्यातील सोनेरी क्षण आहे. यासाठी माझ्या कुटुंबीयाबरोबरच पुनित बालन यांनी प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. त्यामुळे हे सुवर्णपदक मिळवणे शक्य झाले, अशा भावना सुवर्णपदक विजेती ऋतुजा भोसले हिने व्यक्त केल्या.
आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पुनीत बालन ग्रुपची स्टार खेळाडू ऋतुजा भोसले हिने मिक्स डबलमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. त्याबद्दल तिचा “पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष, युवा उद्योजक पुनीत बालन आणि “माणिकचंद ऑक्सीरिच’च्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन, ऋतुजा हिचे पती स्वप्नील गुगळे आणि आई नीता भोसले उपस्थित होते. यावेळी गणपती बाप्पांच्या मोदकाची प्रतिकृती देऊन बालन दाम्पत्याने ऋतुजा हिचा सत्कार केला.
“आगामी काळात ऑस्ट्रेलियन ओपन, ऑलिम्पिक स्पर्धाही येत आहेत. त्याची तयारी करणार आहे. प्रशिक्षकांकडूनही वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असून आगामी ऑलिम्पिकचे ध्येय बाळगले आहे,’ असे ऋतुजा म्हणाली.
ऋतुजाने मेडल जिंकून केवळ “बालनग्रुप’ आणि महाराष्ट्राचेच नाही; तर देशाचे नाव उंचावले, याचा अभिमान आहे. ऋतुजासारख्या गुणी खेळाडूंना मदत करण्यास बालन ग्रुप नेहमी पुढे राहिले. तिला ऑलिम्पिकसाठी आम्ही सर्वप्रकारे आर्थिक मदत करण्यास तयार आहोत. तिने ऑलिम्पिक मेडल जिंकावे हीच आमची इच्छा आहे.
– पुनीत बालन, युवा उद्योजक