पुणे – करोना काळातही धोका पत्करून गरजू पक्षकारांना न्याय मिळवून देण्याचे काम वकील करत आहेत. वकिलांना करोनाची लस मोफत देण्याची मागणी पुणे बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. त्यावेळी अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक, उपाध्यक्ष ऍड. सचिन हिंगणेकर आणि सचिव ऍड. विकास बाबर उपस्थित होते.
शिवाजीनगर येथील न्यायालयात दररोज सुमारे 4 ते 5 हजार वकील ये-जा करत असतात. मोठ्या संख्येने पक्षकार आणि पोलीस येत असतात. लॉकडाऊनकाळात आणि नंतरही वकील हे वारंवार पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी आणि सामान्य व्यक्तींच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना करोना होण्याचा धोका अधिक असतो. भविष्यात करोनाचा संसर्ग फैलवू नये, यासाठी वकिलांना मोफत करोनाची लस देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असल्याची माहिती ऍड. सचिन हिंगणेकर यांनी दिली.