पुणे – खड्ड्यांच्या तक्रारी करा आता व्हॉटस्‌ ऍपवर

पुणे – पावसाळ्यात खड्ड्यांची तक्रार आता थेट व्हॉटस्‌ ऍपवर करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेने प्रत्येक प्रभागासाठी प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांचे मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. या शिवाय, हद्दीत समाविष्ट 11 गावांसाठीही 6 झोन करण्यात आले असून त्यासाठी 12 अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत.

महापालिकेने पावसाळापूर्व कामांत रस्ते दुरूस्ती सुरू केली आहे. त्या सोबतच नागरिकांना तक्रारी करता याव्यात, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या सोबतच आता शहरातील 41 प्रभागांसाठी 2 स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे या प्रभागांमधील सर्व खड्ड्यांची जबाबदारी असेल. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात रस्ता खराब झाल्यास अथवा खड्डे पडल्यास आपल्या प्रभागासाठी नेमलेल्या क्रमांकावर व्हॉट्‌स ऍपवर तक्रार करून त्याचे फोटो पाठवायचे आहेत. तसेच या सोबत गूगल लोकेशन देण्याचीही विनंती करण्यात आली आहे. महापालिकेकडून पहिल्यांदाच अशा प्रकारची मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेमुळे थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार करता येणार आहे.

11 गावांसाठीही सुविधा
महापालिकेकडून ही सुविधा केवळ शहरासाठी न ठेवता महापालिका हद्दीत समाविष्ट 11 गावांसाठीही ठेवण्यात आली आहे. या गावांसाठीच्या प्रभाग 42 मध्ये पथ विभागाने सहा वेगवेगळे विभाग केले असून प्रत्येक विभागासाठी दोन अधिकाऱ्यांचे क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे या गावांमधील नागरिकांनाही महापालिकेकडे खराब रस्ते आणि खड्ड्यांच्या तक्रारी करता येणार आहेत. या सर्व अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक महापालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आले असून “पीएमसी केअर’ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यासही या क्रमांकाची माहिती नागरिकांना मिळू शकणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.