पुणे – मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम रस्त्यावर असलेल्या एका फर्निचर गोदामास सोेमवारी रात्री आग लागली. लाकडी वस्तू तसेच साहित्याने पेट घेतल्याने आग भडकल्याने रात्री उशीरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न करण्यात येत होते. आगीमागचे कारण समजू शकले नाही.
गंगाधाम रस्त्यावर आईमाता मंदिर परिसरात श्री जी लाॅन्सजवळ फर्निचर गोदाम आहे. रात्री पावणेनऊच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. गोदामात लाकडी फर्निचर तसेच वस्तू असल्याने आग भडकली, तातडीने घटनास्थळी पंधरा बंब तसेच टँकर दाखल झाले. आग आटोक्यात येत नसल्याने खासगी टँकरने पाणी मागविण्यात आले. अग्निशमन अधिकारी संजय रामटेके, सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रात्री उशीरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत कोणी जखमी झालेले नाही तसेच जीवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.