पुणे – कचरा प्रकल्पांसाठी सोसायट्यांना पालिकेचे अनुदान?

छोट्या प्रकल्प विक्रेत्यांचे महापालिका प्रशासन करणार पॅनेल

पुणे – शहरातील 100 पेक्षा कमी घरे असलेल्या, तसेच 100 किलोपेक्षा कमी कचरा निर्मिती होणाऱ्या सोसायट्यांना कचरा सोसायटीमध्ये जिरविण्यासाठी महापालिकेकडून अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून तयार करण्यात येत आहे.

संबंधित सोसायट्यांना कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी अशा प्रकल्पांच्या विक्रेत्यांचे पॅनेल महापालिकेकडून तयार केले जाणार असून यामधील प्रकल्पाची खरेदी करणाऱ्यांनाच हे अनुदान दिले जाणार आहेत.

शहरातील 100 किलो पेक्षा जास्त कचरा असलेल्या, तसेच 100 पेक्षा जास्त घरे असलेल्या सोसायट्यांना त्यांच्याच परिसरात निर्माण होणारा कचरा सोसायटीतच जिरविणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, अनेक सोसायट्यांना कोणते प्रकल्प कचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध आहेत, याची माहितीच नसल्याने महापालिका प्रशासनाने अशा प्रकल्पांचे नुकतेच प्रदर्शन भरवित या सोसायट्यांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर आता महापालिकेकडून अशा प्रकल्प विक्रेत्यांचे स्वतंत्र पॅनेलचे नियुक्त केले जाणार असून त्यासाठी विक्रेत्यांनी या पॅनेलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी विक्रेत्यांना 18 जूनपर्यंतची मुदत दिल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

असा आहे प्रशासनाचा प्रस्ताव
शहरातील अनेक लहान सोसायट्यांनी गेल्या काही वर्षांत कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी महापालिकेकडे विचारणा केली आहे. त्या अनुषंगाने लहान सोसायट्यांना कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान देण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. त्यानुसार, महापालिकेने निश्‍चित केलेल्या प्रकल्पांच्या पॅनेलमधील जो प्रकल्प सोसायटी निवडेल, त्या सोसायटीला प्रकल्पासाठीच्या काही खर्चाचा भाग पालिकेकडून अनुदान स्वरूपात दिला जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.