‘आरटीई’ प्रवेशाच्या दुसऱ्या लॉटरीत पुण्याला जास्त, तर नंदूरबारला कमी जागा

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्‍क कायद्याअंतर्गतच्या (आरटीई) 25 टक्‍के प्रवेशासाठी काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय दुसऱ्या लॉटरीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 5 हजार 495 तर नंदूरबारमध्ये सर्वात कमी 118 जागा उपलब्ध झाल्या आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये “आरटीई’च्या प्रवेशासाठी गेल्या चार महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. शाळा सुरू होत आल्या तरी प्रवेशाच्या सर्वच्या सर्व फेऱ्या पूर्ण झालेल्या नाहीत. ऑनलाइन अर्जात दुरुस्ती करण्यासाठी पालकांना दोनदा संधी देण्यात आली. यात बराचसा कालावधी गेला. त्यामुळे दुसरी लॉटरी सतत लांबणीवर पडू लागली होती. अखेर शनिवारी दि.15 लॉटरी काढण्याला मुहूर्त सापडला आहे.

राज्यात 9 हजार 115 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 793 प्रवेशाच्या जागा दाखविण्यात आल्या आहेत. या जागांसाठी 2 लाख 45 हजार 499 अर्ज दाखल झालेले आहेत. पहिल्या लॉटरीद्वारे 67 हजार 716 प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या होत्या. यामधील 47 हजार 34 जागांवर शाळांमध्ये प्रवेश झाले आहेत. 20 हजार 682 जागा रिक्त आहेत. दुसऱ्या लॉटरीत 35 हजार 276 इतक्‍या प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. लॉटरी लागलेल्या पालकांना पडताळणी समितीकडे जावून कागदपत्रांची तपासणी करून शाळांमध्ये 27 जूनपर्यंतच्या मुदतीतच प्रवेश निश्‍चित करावा लागणार आहे, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षण उपसंचालक हारुन अत्तार यांनी दिली आहे. शाळा सुरू होऊ लागल्या तरी अद्याप प्रवेशाच्या फेऱ्या सुरूच आहेत.

जिल्हानिहाय प्रवेशाच्या उपलब्ध जागा
अहमदनगर-1371, अकोला-693, अमरावती-812, औरंगाबाद-1890, भंडारा-353, बीड-780,बुलढाणा-1099, चंद्रपूर-590, धुळे-331, गडचिरोली-270, गोंदिया-332, हिंगोली-385, जळगाव-1371, जालना-1281, कोल्हापूर-884,लातूर-643, मुंबई-2097, नागपूर-2731, नांदेड-1050, नंदूरबार-118, नाशिक-2037, उस्मानाबाद-436, पालघर-378, परभणी-466, पुणे-5495, रायगड-949, रत्नागिरी-241, सांगली-541, सातारा-552, सिंधुदुर्ग-167, सोलापूर-794, ठाणे-2643, वर्धा-439, वाशिम-388, यवतमाळ-669.

Leave A Reply

Your email address will not be published.