पुणे –समग्र शिक्षा अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात राज्यातील 35 लाख 92 हजार 921 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून 215 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झालेला आहे.
शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील मुले, दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले यांच्यासाठी मोफत गणवेशाची योजना लागू आहे. समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकासाठी केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीत निधी खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. प्रती गणवेश 300 रुपये याप्रमाणे दोन गणवेशासाठी प्रती विद्यार्थी 600 रुपये याप्रमाणे निधीची तरतूद मंजूर झालेली आहे. गणवेश योजनेची मंजूर तरतूद शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खर्च करावी लागणार आहे. केंद्र, तालुका, जिल्हा स्तरावरुन गणवेशाकरिता मंजूर असलेली तरतूद खर्च करता येणार नाही, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
*गणवेश पुरवठ्यांचे संपूर्ण अधिकार शाळा व्यवस्थापन समितीकडेच
*मंजूर तरतूदीपेक्षा अधिकचा खर्च करता येणार नाही
*गणवेशाचा दर्जा उत्तम असलाच पाहिजे
*गणवेश वितरणास विलंब करू नये
*पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत