पुणे –ससून रुग्णालयातील कारभाराच्या गोष्टी कायमच चव्हाट्यावर येत असतात. त्यात आणखी एक भर म्हणजे संगणकातील राहून गेलेल्या नोंदी या होय. एक रुग्ण रुग्णालयात दाखल होता. त्याचे ऑपरेशन झाले आणि त्याला डिस्चार्जही मिळाला. त्यानंतर त्याला फेरतपासणीसाठी बोलावण्यात आले. तेव्हा येथील कारभार उघड झाला.
संबंधित रुग्ण आल्यानंतर त्याला केसपेपरमध्ये नोंद करायला सांगितली. तेव्हा त्याला “तुम्हाला डिस्चार्ज मिळालाच नाही, तर तपासणीसाठी केसपेपर कुठून द्यायचा?’ असा प्रश्न कर्मचाऱ्याने विचारला. त्यावर रुग्णाला डिस्चार्ज देऊन आठवडा उलटला आहे, तरी रुग्ण ऍडमिटच कसा दिसतो? असा प्रश्न त्यांना विचारला असता, उत्तर देण्याला त्यांनी असमर्थता दर्शवली. अमुक अमुक खिडकीपाशी जाऊन डिस्चार्ज झाल्याची ऑनलाइन नोंद करून या असे रुग्णाला सांगण्यात आले.
प्रत्येक खिडकीपासून फुटबॉलप्रमाणे अन्य सगळ्या खिडक्यांमध्ये फिरवल्यानंतर अखेर शेवटच्या खिडकीपर्यंत रुग्ण पोहोचला. तेथे बिल भरलेल्याची पावती मागवण्यात आली. ती दाखवल्यानंतर तुम्हांला डिस्चार्ज दिल्याची संगणकावर नोंद करण्यात येईल, असे सांगण्यात आले. संबंधित रुग्णाला डिस्चार्ज मिळून आठवडा उलटला असतानाही संगणकावर त्याची नोंदच झाली नव्हती. दरम्यान, याविषयी प्रभारी अधीक्षक डॉ. विजय जाधव यांना विचारले असता, ससूनमध्ये हजारांनी रुग्ण रोज दाखल होतात, तितक्यांना रोज डिस्चार्जही मिळतो. किती रुग्णांचे रेकॉर्ड पहात बसायचे, असे धक्कादायक उत्तर जाधव यांनी दिले.
असे प्रकार घडतात, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत सगळ्या विभागप्रमुखांना आधीही सूचना करण्यात आल्या आहेत. संगणक प्रणालीपेक्षा या नोंदी करणाबाबत उदासीनता आहे. पुन्हा एकदा विभागप्रमुखांची बैठक घेण्यात येईल. रुग्णांच्या फाइलवर त्याला डिस्चार्ज दिल्याची “मॅन्युअल’ नोंद केलेलीच असते, परंतु संगणकावर मात्रे ती नोंद नसते, हे देखील दिसून आले आहे. – डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, बी. जे वैद्यकीय महाविद्यालय