पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातील वेताळ टेकडीवर दोन मुली मद्यधुंद अवस्थेत सापडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने त्यांच्या हद्दीतील टेकड्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक दक्ष राहण्याच्या सूचना रक्षकांना दिल्या आहेत. शिवाय वनपरिक्षेत्रात असा प्रकार घडल्यास तात्काळ मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी दिले आहेत.
शहरातील तळजाई, हनुमान आणि वेताळ टेकड्यांवरील वनक्षेत्रात सुरक्षितता हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा असतो. अनेक टेकड्यांवर सायंकाळी लोक फिरायला जातात. मात्र, अंधार पडल्यावर काही मद्यपी, गर्दुल्ले हे त्याठिकाणी आपला पसारा मांडून मद्यपान करत बसतात. अनेकदा त्यांच्यात मारामारी, खून अशा गुन्हेगारी घटनाही घडल्या आहेत.
हिवाळ्यात मद्यपींकडून शेकोटी देखील पेटवली जाते, सिगारेटी ओढल्या जातात. अशा वेळी ठिणगी उडून वणव्यासारखे प्रकारही घडतात. शहराच्या हद्दीव्यतिरिक्त सिंहगड, ताम्हिणी, लोणावळा या जंगल परिसरातही पर्यटक मद्यपान करताना दिसतात.
विभागाचे अधिकारी वनक्षेत्रात नियमित गस्त घालतात. शहरी भागात या घटनांचे प्रमाण जास्त आहे, जिथे लोकांना जंगलात सहज प्रवेश मिळतो. ग्रामीण भागात जंगले तुलनेने दुर्गम असल्याने येथे अशा घटनांची नोंद होत नाही, असे सहायक वनसंरक्षक मयूर बोठे यांनी सांगितले.
मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या वनक्षेत्रावर बारकाईने लक्ष ठेवणे हे आव्हान असल्याचे वन अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. जंगल हे खूप मोठे क्षेत्र आहे आणि तेथे अनेक प्रवेश बिंदू आहेत आणि प्रत्येक प्रवेश बिंदूवर लक्ष ठेवणे व्यावहारिकदृष्ट्या कठीण आहे. लोकांना या एंट्री पॉइंट्सची चांगली माहिती आहे आणि त्यामुळे जंगलाच्या परिसरात सहज प्रवेश मिळतो, असे एन. आर. प्रवीण यांनी सांगितले.
आमच्याकडेही मनुष्यबळाची टंचाई आहे; परंतु अलीकडेच ६७ वनरक्षकांच्या भरतीमुळे आम्ही मनुष्यबळाचा प्रश्न काही अंशी सोडवू शकू, तसेच या विभागाने विविध भागात वनजमिनींवर सीमांकन आणि कुंपण टाकण्याचा प्रकल्पही हाती घेतला. काही भागात आम्ही काम पूर्ण केले आहे. आगामी काळात हडपसर आणि कोंढवा-एनआयबीएम परिसरातील वनक्षेत्रात कुंपण घालण्यात येणार आहे. मात्र, डोंगराळ भागातील अवघड भाग लक्षात घेता, सर्व ठिकाणी कुंपण घालणे शक्य नाही, असे एन. आर. प्रवीण यांनी सांगितले.
गस्त वाढविणे हाच उपाय
अलिकडे टेकड्यांवर जाणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांच्यापैकी बहुतेकजण व्यायामासाठी किंवा निसर्गाच्या सान्निध्याचा आनंद घेण्यासाठी जातात; परंतु काही लोक केवळ तेथे अवैध काम करण्यासाठी जातात. येथे वनविभागाची गस्त वाढविल्यास केवळ हेच प्रकार नव्हे, तर अवैध वृक्षतोड आणि पर्यायाने वन परिसंस्थेला हानी पोहोचवणाऱ्या कृतींना आळा बसू शकेल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.