पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य सीईटी सेलने एमबीए सीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी एमबीए सीईटी दोन दिवसात घेण्यात येणार होती. आता नव्या वेळापत्रकानुसार एमबीए सीईटी तीन दिवसांत होणार असून, दि. ९ ते ११ मार्च या कालवधीत आयोजित करण्यात आली आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा राबविण्यात येत आहे. या सीईटीच्या तारखाही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान, एमबीए सीईटी ९ ते १० मार्च रोजी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार होती. मात्र या सीईटीसाठी विद्यार्थ्यांची संख्येत वाढ झाल्यामुळे आता तीन दिवसांत सीईटी घेण्याचे नियोजन राज्य सीईटी सेलने केले आहे.
त्यानुसार ही सीईटी ९ ते ११ मार्च अशा तीन दिवसांत घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक राज्य सीईटी सेलने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे . तसेचसर्व उमेदवारांना राज्य सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर या सीईटसाठी हाॅलतिकीट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याची प्रिंटआउट काढून घेणे आवश्यक आहे.