पुणे- करोनामुळे शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही शाळांकडून 100 टक्के फी वसुलीचा तगादा लावण्यात आला. तत्पूर्वी शाळांनी 15 टक्के शुल्क कपात करण्याबाबतचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, शाळांकडून त्यांची अंमबजावणीच केली जात नाही. याबाबत पालकांनी जवळपास 8 शाळांविरुद्ध तक्रारी केल्या आहेत.
पुणे विभागीय शुल्क नियामक समितीकडे आठ शाळांबाबत पालकांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यावर आता शाळांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. दरम्यान, काही शाळांनी फी कमी करण्याऐवजी ती वाढवल्याची बाबही समोर आली आहे. यावर पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, शुल्क नियामक समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली.
यात विविध माहिती भरुन घेण्याबाबतचे फॉर्म तयार करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार फॉर्म तयार करण्याचे कामकाजही सुरू करण्यात आले. आत मेच्या दुसऱ्या आठवड्यात या समितीची बैठक होणार आहे. त्यापूर्वी शाळांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.
तक्रारदार पालक, शाळा प्रशासन, संबंधित शिक्षणाधिकारी या सर्वांनी सुनावणीला उपस्थित राहणे बंधनकारक आहे. प्रत्येकाला यास माहिती सादर करण्यास संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतरच योग्य तो अंतिम निर्णयही घेण्यात येणार आहे.