पुणे – पोलीस अधिकारी असल्याचे भासवून कस्टम विभागात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 51 लाख 17 हजार रूपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकास अटक केली. त्यास मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.के. बाफना-भळगट यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय 43, रा. तुकाई टेकडी, काळेपडळ हडपसर) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ कामगाराने फिर्याद दिली आहे. कसबा पेठ, मंगळवारपेठ परिसरात 2017 ते मार्च 2021 या कालावधीत हा फसवणूकीचा प्रकार घडला.
फिर्यादी हे कपड्याच्या दुकानात कामास आहेत. त्यांना शिंदे याने खाकी वर्दी परिधान केली तसेच महाराष्ट्र पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी केली. त्यांचा फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कस्टम विभागात माझ्या ओळखी आहेत, असे बोलून महिलेच्या मदतीने फिर्यादीचा मुलगा, पुतण्या आणि भाचा यांना नोकरी लावून देतो असे सांगितले आणि त्यासाठी 51 लाख 17 हजार 400 रूपये घेत त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केली. त्याच्याकडून गुन्ह्यांतील रक्कम जप्त करणे, गुन्ह्यांत आणखी कोणी साथीदार आहे का? तसेच गुन्ह्यांत त्याच्या सहकारी महिलेस अटक करणे तसेच अशाप्रकारे पोलीस असल्याचे सांगून आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा आणि गुन्ह्यात जप्त केलेली खाकी वर्दी, नेमप्लेट, ओळखपत्र त्याने कोठून घेतले याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी ऍड. क्षीरसागर यांनी केली.