नवी दिल्ली – जगभरात करोना विरोधी लसीकरण केले जाते आहे. मात्र पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस कधी घ्यायचा हा वादाचा विषय बनला असून त्यावर चर्चाही झडत आहेत.
ऍस्ट्रोजेनेकाच्या लसीचा दुसरा डोस भारतात सध्या 8 ते 10 आठवड्यांनी दिला जातो आहे. मात्र हा डोस 44 ते 45 आठवड्यांनी दिला तर अधिक लाभकारी ठरत असल्याचे अँटीबॉडीजचे प्रमाण चारपट अधिक वाढत असल्याचे आढळून आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ऑक्स्फर्ड व्हॅक्सिन ग्रुपच्या एका अहवालानुसार, सध्याच्या आठ ते दहा आठवड्यांच्या कालावधीऐवजी दुसरा डोस देण्याचा कालावधी 44 ते 45 आठवड्यांचा केला तर त्याचे अधिक चांगले परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे.
तसेच व्हॅक्सिनच्या मदतीने अँटीबॉडीची लेव्हल एक वर्षापर्यंत उच्च राहते. मात्र वर्षभरानंतर बूस्टर डोस दिला गेला तर लस अधिक प्रभावशाली ठरते असाही दावा या अहवालात करण्यात आला आहे.
संबंधित व्हॅक्सिन ग्रुपने याचा अभ्यासही केला आहे. त्यांनी काही स्वयंसेवकांना 15 ते 25 आठवड्यांत लसीचा दुसरा डोस दिला होता. त्यांच्या शरीरात अँटीबॉडीजची लेव्हल 8 ते 12 आठवड्यांत दुसरा डोस दिलेल्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय बूस्टर डोस दिल्याने तुमची इम्युन सिस्टिम अधिक प्रभावशाली होत असल्याने हा बूस्टर दिला जावा अशीही सूचना करण्यात आली आहे.
भारतात अगोदर ऍस्ट्रोजेनेकाची लस अर्थात कोविशिल्डचा दुसरा डोस 8 ते 12 आठवड्यांत दिला जात होता. नंतर हा कालावधी वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहेत. आता नव्या संशोधनानुसार हा कालावधी 44 ते 45 आठवड्यांचा करण्याची शिफारस केली जाते आहे.