पुणे- ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिलांची मुदत संपत असल्याने महापालिका मुख्य विभागासह, सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचारी सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत बिलांच्या फाइल स्वीकारत जीवाचे रान करताना दिसून आले. विशेष म्हणजे, अनेक क्षेत्रीय कार्यालयात तर चक्क बिगारी असलेले सेवक फाइल इनवर्ड करून त्या बिलांसाठी दाखल करत होते.
एरव्ही, सर्वसामान्य नागरिकांना किरकोळ कामांसाठी महापालिकेचे उंबरे झिजवतत तासन्तास ताटकळत थांबावे लागते. भवन, पथ, पाणी पुरवठा, ड्रेनेज, घनकचरा, विद्युत विभागांसह क्षेत्रीय कार्यालयांत हे चित्र दररोज दिसते. तर, साडेपाच वाजेनंतर एकही कर्मचारी कार्यालयात थांबत नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हे चित्र पूर्ण बदलले आहे. महापालिकेचे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत असले, तरी आयुक्तांनी सर्व विभागांना 25 मार्चपर्यंत ठेकेदारांची बिले सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून ठेकेदारांची बिले मिळवून देण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड सुरू आहे. या कर्मचाऱ्यांच्या दिमतीला अनेक नगरसेवकांनी आपले कार्यकर्ते दोन दिवसांपासून पालिकेतच “मुक्कामी’ ठेवले असून, ठेकेदारांची बिले दाखल करून घेतली जात आहेत. शुक्रवारी ही मुदत संपत असल्याने अनेक क्षेत्रीय कार्यालयात गुरूवारी मध्यरात्रीपर्यंत काम सुरू होते. तर, शुक्रवारी रात्रीही हीच स्थिती कायम असल्याचे दिसून आले.
…तर जबाबदार कोण?
काही क्षेत्रीय कार्यालयांत बिगारी तसेच ठेकेदारांचे कर्मचारीच महापालिका कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ऑनलाइन इनवर्ड क्रमांक टाकत होते. तसेच फाइल स्कॅन करून घेत होते. त्यामुळे बिलांमध्ये फेरफार झाली आणि बनावट बिले सादर झाली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल पालिका वर्तूळातून उपस्थित केला जात आहे.