पुणे- महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागापाठोपाठ आता मालमत्ता व्यवस्थापन विभागही “ऍक्शन मोड’मध्ये आला आहे. गेल्या आठवडाभरात या विभागाने 3 कोटी 28 लाख रुपयांची थकबाकी असलेले 27 गाळे सील केले आहेत. त्यात रविवार पेठेतील 3, टिळक रस्त्यावरील ढेरे उद्योग भवन येथील गाळा क्रमांक. 5, वाकडेवाडी येथील गाळा क्रमांक 2, घोरपडे पेठेतील प्रियंकाजी महिला उद्योग समूहाला दिलेले 13 गाळे, सावरकर भवन येथील 6 गाळे आणि येरवडा येथील हुले कॉम्प्लेक्समधील 3 गाळ्यांचा आहे, अशी माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली.
शहरात महापालिकेच्या एकूण 3 हजार 899 मिळकती आहेत. काही मिळकती “आर 7’अंतर्गत ताब्यात आल्या आहेत. तर, महापालिकेने बांधकाम केलेल्या 19 मिळकती आहेत. हेक गाळे, दुकाने, हॉल अशा मिळकती पालिकेने व्यावसायिक कारणांसाठी भाड्याने दिले आहेत. त्यातील आतापर्यंत 59 कोटींपैकी 37 कोटी रुपये वसूल झाले आहेत. तर, अद्याप 22 कोटी रुपयांची थकबाकी कायम आहे. त्यामुळे वसुलीसाठी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. जे व्यावसायिक भाडे भरणार नाहीत, त्यांचे गाळे सील करण्यात येणार असून थकबाकी न भरल्यास हे गाळे निविदा काढून वितरीत केले जाणार आहेत.
थकबाकीदारांत टिळक रस्त्यावरील ढेरे उद्योग भवनमधील येथील एका गाळ्याची सर्वाधिक 1 कोटी 5 लाख रुपये थकबाकी आहे. तर, सावरकर भवन येथील 6 गाळ्यांचे 1 कोटी 40 लाख रुपये थकले आहेत. आंबेगाव येथील मैदान पुरंदर टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला भाडेतत्वावर दिले होते. ते मैदान ताब्यात घेतले आहे.
– राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन