पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सन 202४-2५ ची वार्षिक निवडणूक ३१ जानेवारी रोजी होणार आहे. शिवाजीनगर न्यायालयात सकाळी ९ ते सायंकाळी ५.०० या वेळेत मतदान होणार आहे. त्याचदिवशी मतमोजणी करून रात्री निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
उमेदवारी अर्जाच्या फॉर्मची विक्री आणि स्वीकृती १० जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शिवाजीनगर न्यायालयातील पुणे बार असोसिशनच्या कार्यालयात होणार आहे. ११ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत फॉर्म माघारी घेता येणार आहे. निवडणूकीचे अंतिम चित्र १२ जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे.
१२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे बार असोसिएशनच्या कार्यालयात उमेदवारांची अंतिम यादी जाहिर होणार आहे. २९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता अशोका हॉल येथे उमेदवार आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. मतमोजणी आणि निकाल ३१ जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को- अॉपरेटीव्ह सोसायटीचे माजी चेअरमन अॅड. दादाभाऊ शेटे काम पाहत आहेत.
तर अॅड. कल्याण शिंदे आणि अॅड. योगेश देशमुख उपनिवडणूक अधिकारी आहेत. अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला १० हजार रुपये, उपाध्यक्ष पदासाठी ८ हजार रुपये, सचिव पदाकरीता ६ हजार रुपये, खजिनदार पदाकरीता ५ हजार रुपये, हिशेब तपासणीस पदाकरीता ४ हजार रुपये, कार्यकारिणी सभासद पदाकरीता ३ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. केतन कोठावळे यांनी याबाबतची माहिती दिली.