कारेगाव येथील घटना : रांजणगाव पोलिसांत गुन्हा
रांजणगाव गणपती – कारेगाव (ता. शिरुर) येथे नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्य करणाऱ्या भाडेकरुने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या केली. सविता अशोक रंधवे (सध्या रा. कारेगाव, मूळ रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, नगर), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
अशोक भिमराव रंधवे (सध्या रा. कारेगाव, मूळ रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, नगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सचिन दिलीप कातकाडे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी अशोक भिमराव रंधवे (सध्या रा. कारेगाव, मूळ रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, नगर) हे पत्नी व कुटुंबासमवेत भाड्याने राहत आहेत.
दरम्यान (दि.७) सायंकाळी कारेगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळील देशमुख यांच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये अशोक भिमराव रंधवे यांनी पत्नी सविता अशोक रंधवे हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या डोक्यात, कपाळावर लोखंडी टिकावाने मारुन गंभीर जखमी करुन तिचा खून केला. हा गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे यांनी दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरडे हे करीत आहेत.
करार नसल्याने भाडेकरू गोत्यात
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले की , सदर आरोपी हा ज्या खोली मालकाकडे भाड्याने राहत होता त्या खोली मालकाकडे या भाडेकरुचे कसले ही कागदपञे अथवा भाडेकरार आढळून आला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी व खोली मालकांनी भाडेकरार करुन घ्यावा व भाडेकरुंची आधार कार्ड व रेशनकार्डची झेराँक्स जवळ बाळगावी असे आवाहन केले आहे.