पुणे – देशाचा महत्त्वाकांक्षी सौर मोहीम अर्थात ‘आदित्य-एल१’च्या ‘सूट’ उपकरणाने सूर्याची पहिली प्रतिमा पृथ्वीकडे यशस्वीपणे पाठवली आहे. आदित्यचा सूर्याकडील गंतव्य स्थळाकडे प्रवास चालू असतानाच त्याने ही कामगिरी यशस्वी केली आहे. पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी (आयुका) केंद्राने विकसित केलेले हे उपकरण आहे. आदित्य-एल१ कडून सूर्याची पहिली प्रतिमा प्राप्त झाल्यानंतर आयुकातील वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी एकच जल्लोष केला. आयुकातील सूट उपकरणाची संकल्पना विकसित करण्यात अनेक अभियंते हे मराठी भाषिक आहेत. ही उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.
यासंदर्भात सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपचे (सूट) मुख्य अन्वेषक प्रा. दुर्गेश त्रिपाठी म्हणाले, ‘‘शास्त्रज्ञ म्हणून आमच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण आहे. प्रथमच एका अंतराळ दुर्बिणीद्वारे संपूर्ण तरंगलांबीची डिस्क प्रतिमा प्राप्त केली आहे. ज्यामुळे सूर्याच्या पृष्ठभागाच्या आतील सौर वातावरणाचे वैशिष्ट्यांचा उलगडा येईल. सूट उपकरणाने घेतलेला डेटा सौर वायुमंडलीय अभ्यासासाठी एक नवीन आयाम खुला करणार आहे.’’ सूर्यासंबंधीच्या या निरीक्षणामुळे अंतराळातील सौर अभ्यासात भारत आघाडीचा देश ठरणार आहे.
या उपकरणात २०० ते ४०० नॅनोमीटर तरंगलांबी श्रेणीमध्ये कार्यरत असलेले ११ विशेष फिल्टर लावण्यात आले आहे. ज्यांच्याद्वारे सूर्याच्या फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियरच्या उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा मिळणार आहे. आता मिळालेल्या प्रतिमेत तीन वेगवेगळी फिल्टर्स वापरून उपलब्ध झाली आहे. ज्यामध्ये सूर्याच्या पृष्ठभागाच्या क्रोमोस्फियर आणि फोटोस्फियर थरांविषयी प्रथम तपशीलवार माहिती मिळणार आहे.
सौर विज्ञानाचा नवा मार्ग
सूट कार्यान्वित झाल्यामुळे सूर्याच्या ऊर्जावान अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्गाचा अभ्यास करण्याची क्षमता वाढणार आहे. उपकरण पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर शास्त्रज्ञांना चुंबकीय सौर वातावरणाच्या डायनॅमिक कपलिंगचा शोध घेता येईल. शास्त्रज्ञ आता आदित्य-एल१ त्यांच्या गंतव्यस्थळी पोहचण्याची वाट पाहत आहेत.
“सूट उपकरणामुळे सौरभौतिकशास्त्रातील नवे प्रवाह प्रचलित होणार आहेत. खगोलशास्त्रज्ञांना सूर्याविषयी असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे यामुळे मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे.” – – प्रा. ए.एन. रामप्रकाश, मुख्य अन्वेषक, सूट (आयुका)