पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) राबविण्यात येत असणा-या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) प्रकल्पाला अर्बन इन्फ्रा समुहाकडून नाविन्यपूर्ण सार्वजनिक खासगी भागिदारी (पीपीपी) मेट्रो प्रकल्प हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर, हा प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करणा-या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांना देखील मॉडर्न मेट्रो वुमन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पीएमआरडीएने माण-हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन ३ मास रॅपिड ट्रान्झिट अंतर्गत या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. उन्नतमार्ग मेट्रो मार्गाची लांबी २३.२०३ कि.मी. असून या मार्गिकेत २३ स्थानके आहेत. केंद्र सरकारच्या मेट्रो रेल धोरण २०१७ अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर संकल्पना करा, बांधा, अर्थ पुरवठा करा, चालवा आणि हस्तांतर करा (डीबीएफओटी) या मॉडेल अंतर्गत राबविण्यात येत असलेला हा पहिला प्रकल्प आहे.
महानगर आयुक्त राहुल महिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण या यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत मेट्रो लाइन ३ प्रकल्पाचे भौतिक काम सुमारे ५१.१४ टक्के व आर्थिक उद्दिष्ट ४६.६८ टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती पीएमआरडीएकडून कळविण्यात आली आहे.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाला अर्बन इन्फ्रा समूहाकडून दिला जाणारा सन २०२३ चा सर्वात नाविन्यपूर्ण पीपीपी मेट्रो प्रकल्प पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यासोबतच अर्बन इन्फ्रा समुहाकडून मुख्य अभियंत्या रिनाज पठाण यांना मॉडर्न मेट्रो वुमन ऑफ द इयर २०२३ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्राधिकरणाच्या वतीने मुख्य अभियंता रिनाज पठाण, कार्यकारी अभियंता राजू ठाणगे, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी दर्शन बंब आदी उपस्थित होते.