– पळून गेलेला कंटेनर चालक लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात
लोणी काळभोर – येथे मामा आपल्या भाचीना दुचाकीवर शाळेत सोडायला जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २०) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
शनिवारी सकाळी साडेसात वाजता पांडुरंग नवनाथ भिक्षे (वय 42 , रा. काळभोर नगर, कवडीपाट , ता. हवेली) हे कवडीपाट येथून त्यांच्या भाची गायत्री नंदकुमार शितोळे ( वय 17 ) व राजश्री नंदकुमार शितोळे ( वय 10) यांना कन्या शाळा लोणी काळभोर मध्ये सोडण्याकरीता जात होते. दरम्यान साडेसात वाजता लोणी स्टेशन चौक याठिकाणी एका भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील मामा आणि मुली वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्या यावेळी कंटेनर मुलींच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मात्र त्यांचा मामा हा बचावला असून त्याला कुठली दुखापत झाली नाही.
अपघातनंतर कंटेनरचालक कंटेनरसह पळून गेला होता मात्र कंटेनर पकडण्यात लोणीकाळभोर पोलिसांना यश आले आहे. तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.