अनंत झांबरे ः इंदापूर येथे मोफत योग प्राणायम शिबिराला सुरुवात
इंदापूर – भारतीय आयुर्वेदाचे महत्व, जागतिक आरोग्य संस्थेने मान्य केले आहे. जागतिक स्तरावर जवळपास दोनशे कोटी नागरीकांना याचा फायदा झाला आहे. यामध्ये संजीवनी क्रिया, उपवास, ग्रीन ज्यूस, अपक्व आहार असा हा उपचार असून, विश्व आरोग्य संस्थेनुसार कोठेही बरे न होणारे आजार या पारंपरिक चिकित्सा उपचार पद्धतीने बरे झाले आहेत. त्यामुळे मानवी आरोग्यासाठी पारंपरिक चिकित्सा उपचार फायदेशीर आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध नॅचरोपॅथी तज्ञ अनंत झांबरे यांनी केले.
इंदापूर येथे पतंजली योग परिवार व महिला पतंजली योग समितीच्या वतीने 19व्या वर्धापदिनानिमित्त इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे आयोजित, मोफत योग प्राणायाम शिबिराला सोमवारी (दि. 4) सुरुवात करण्यात आली. यावेळी सायंकाळी अनंत झांबरे यांचे नॅचरोपॅथी व उपचार पद्धती, व्याख्यानाची सुरुवात इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पतंजली परिवाराचे योगगुरू दत्तात्रय अनपट, जितेंद्र माने, दत्तात्रय दडस व हजारो योगसाधक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनंत झांबरे म्हणाले, नागरिकांनी त्यांच्या खाण्या-पिण्याच्या पद्धती बदलणे काळाची गरज आहे. जेवणाच्या वेळेबरोबरच, आहार हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर वेळोवेळी शरीरशुद्धी करणे महत्वाचे आहे. शरीरातील हानीकारक घटक संजीवनी क्रियांतून वेळोवेळी बाहेर काढणे गरजेचे आहे. संजीवनी क्रिया करण्यास कसल्याही प्रकारचा खर्च नसून, अतिशय सोपी घरगुती पद्धती आहे. आपल्या पोटातील मैला स्वच्छ झाला नाही तर, शरीरात अनेक आजारांना निमंत्रण मिळते. मानवी शरीरात आजार नाहीत, आपल्या चुकीच्या खाणपानमुळे रोग होत आहेत.
मोफत योग प्राणायाम शिबिराला सुरवात
इंदापूर येथे पतंजली परिवाराच्या वतीने मोफत योग शिबिराला सोमवारी पहाटे 5 वाजता सुरवात करण्यात आली. यावेळी शिबिराचे उद्घाटन सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, वकील संघटनेचे माजी अध्यक्ष मनोहर चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भिसे, आरपीआयचे शिवाजीराव मखरे, नगरसेवक बाळासाहेब ढवळे, गोरख शिंदे, पांडुरंग शिंदे, युवक नेते प्रशांतमामा उंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक योग प्राणायम शिबिराला उपस्थित होते.