पुणे – विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या त्रिमितीय आराखड्यांवरून सेल्फी पाॅइंट उभारण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या आराखड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी होती. त्यावरून विरोधकांकडून टीका निर्माण झाल्यानंतर संबंधित लिंकवरून आराखडेच गायब झाल्याचे दिसून आले.
भारताच्या विविध क्षेत्रांतील ही कामगिरी साजरी करण्यासाठी उच्च शिक्षण संस्थेत सेल्फी पॉइंट उभारण्याचे निर्देश युजीसीकडून देण्यात आले. विविध क्षेत्रांंतील भारताच्या कामगिरीची, विशेषत: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०अंतर्गत उपक्रमांची माहिती करून देण्याचा उद्देश त्यामागे आहे. विद्यार्थी आणि पाहुण्यांना या सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेऊन समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, यूजीसीकडून परिपत्रकात गुगल ड्राईव्हचा दुवा (लिंक) देण्यात आला होता. त्याद्वारे सेल्फी पॉईंटसाठीचे मान्यताप्राप्त त्रिमितीय आराखडे उपलब्ध करून देण्यात आले होते. या आराखड्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी होती. मात्र काँग्रेस, तृणमूल काँग्रेसने सेल्फी पॉईंटच्या निर्देशांवर टीका केली. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर युजीसीच्या परिपत्रकातील दुव्यावर सेल्फी पॉईंटचे पंतप्रधानांची छबी असलेले आराखडे आता उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.