टोमॅटो काढणीसाठी परिपक्व होऊन विक्रीसाठी उपलब्ध
मलठण – दौंड तालुक्यातील बोरीबेल परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड झाली आहे. सुमारे 150 ते 200 एकर लागवड झाल्याचा अंदाज आहे. साधारणपणे 15 मे पासून आगाप लागवडींना सुरुवात होते. जून महिन्यात मान्सून दाखल झाला की या लागवडीस वेग येतो. सुरुवातीच्या काळात लागवडी झालेला टोमॅटो काढणीसाठी परिपक्व होऊन विक्रीसाठी नारायणगाव (ता. जुन्नर) येथे दाखल होऊ लागला आहे.
पुणे जिल्ह्यात नारायणगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यामुळे नारायणगाव हे टोमॅटोचे आगार आहे असे समजले जाते. जिल्ह्यात त्या पाठोपाठ दौंड तालुक्यातील बोरिबेल परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात लागवडीचे प्रमाण वाढत आहे. हा टोमॅटो विक्रीसाठी नारायणगाव मार्केटला नेला जातो. कारण त्या ठिकाणी स्थानिक व इतर राज्यातून माल खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी दाखला होतात.
चालू वर्षाच्या हंगामातील टोमॅटो नारायणगाव मार्केटला दाखल होत आहे. पुढील 15 दिवसांत टोमॅटो मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दाखल होणार आहे. आवक वाढू लागल्याने टोमॅटोच्या भावात काहीशी घसरण झाली आहे. मागील 15 दिवसांपूर्वी प्रति किलो 20 ते 22 रुपये मिळणारा बाजारभाव आता 12 ते 15 रुपयांपर्यंत खाली आला आहे; परंतु इतर राज्यात टोमॅटोला मागणी वाढली तर चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.
चालू वर्षी टोमॅटोच्या लागवडीत प्रचंड वाढ झाली आहे; परंतु सरासरी उत्पादन कमीच आहे. लागवडीचे प्रमाण वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण होत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याचा विचार करून शेजारील देशांमध्ये टोमॅटोची निर्यात करावी. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना समाधानकारक दर मिळेल अशी अपेक्षा आहे.
– गोरख रसाळ, टोमॅटो उत्पादक शेतकरी, बोरीबेल