जिल्हा बॅंकेच्या कुरकुंडी शाखेचे स्थलांतर
आंबेठाण – महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून कृषि पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न करण्यात येत असून त्याद्वारे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.
खेड तालुक्यात कुरकुंडी येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखेच्या नवीन इमारतीत स्थलांतर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, निर्मला पानसरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, सहायक निबंधक हरीचंद्र खेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, वरिष्ठ अधिकारी गौतम कोतवाल, सरपंच सागर जावळे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, ग्रामीण भागात “ऍग्रो टुरिझम’ला चांगली संधी आहे. सहकारी संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा. प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर झाल्यास निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
यावेळी तालुक्यात 90 टक्क्यापर्यंत वसुली करणाऱ्या विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचा राज्यमंत्री तटकरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मोहिते पाटील आणि अध्यक्ष दुर्गाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
बॅंकेने शिक्षणासाठी मदत करावी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही देशातील एक उत्कृष्ट संस्था आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बॅंकेने दर्जा टिकवावा. कुरकुंडी शाखेच्या नवीन इमारतीचे कामकाज चांगले झाले आहे. या ठिकाणी ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना परराज्यात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी बॅंकेच्या माध्यमातून मदत होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करताना त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही तटकरे यांनी सांगितले.