सीसीटीव्ही बंद ः दागिन्यांवर डल्ला
तपास यंत्रणेत येतोय अडथळा
भोर – भोर एसटी बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे गेले काही दिवस बंद आहेत. अन्य सुविधांचाही येथे अभाव आहे. त्यातच बस स्थानकात कायमच प्रवाशांची गर्दी असते याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट या परिसरात झाला असल्याचे दिसून येत आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याबरोबरच इतरही चोऱ्या येथे वाढल्या आहेत. बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरीचा तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेत अडथळा निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, शनिवारी (दि. 21) प्रवासी महिला शोभा नंदकुमार गायकवाड (रा. शिरवळ, ता. खंडाळा) ही भोर एसटी स्थानकावरून प्रवासासाठी एसटीने निघाले असता गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील 20 ते 22 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी व त्यात आसलेले मणीमंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. यात प्रवासी महिलेचे 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद प्रवासी महिला शोभा गायकवाड यांनी भोर पोलीस स्टेशनला दिली आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी प्रवासी महिला ही भोर शिरवळ एसटीने शिरवळ कडे निघाली होती एसटी प्रवास सुरू असताना वडगाव (ता. भोर) येथे गेल्यानंतर गळ्यातील मंगळसूत्र नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने भोर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली. या चोरीचा तपास भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार धर्मवीर खांडे, राहुल मखरे करीत आहेत.
भोर एसटी स्थानकावरून बस प्रवासी फेऱ्या वेळेवर न सुटणे, त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढणे, मूलभूत सुविधांचाही अभाव या व अशा अनेक कारणांनी भोरचे एसटी स्थानक नेहमीच प्रवाशांच्या चर्चेत असताना स्थानकावर होणाऱ्या वाढत्या चोऱ्यांची आता यात भर झाली आहे.
++++++