जिल्ह्यातील एक हजार चोपन्न शाळांतील स्थिती
व्यंकटेश भोळा
पुणे – पुणे जिल्हा परिषदेतील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या तब्बल 1 हजार 54 प्राथमिक शाळा असल्याची माहिती समोर आली आहे. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्यास “झेडपी’च्या एकूण शाळांची संख्या पाहता 30 टक्के शाळा बंद होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा अथवा त्या जवळच्या शाळेत समायोजित करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागविली आहे. त्यावरून पटसंख्या कमी असलेल्या शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्यास सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पुणे जिल्हा परिषदेत सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण 3 हजार 637 शाळा आहेत. त्यापैकी 1 हजार 54 शाळांतील पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे. विशेषत: भोर, खेड, मुळशी, आंबेगाव आणि वेल्हे तालुक्यात कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या जास्त आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या काही शाळा अतिदुर्गम भागातही आहेत. त्यामुळे तेथील शाळांची संख्या कमी आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंदचा निर्णय झाल्यास 1 हजार 54 शाळा बंद कराव्या लागणार आहेत. त्यामुळे हा निर्णय घेताना राज्य सरकारला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
हवेलीत संख्या सर्वांत कमी
हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या जिल्ह्यात सर्वांत कमी आहे. विशेषत: शहरालगतच्या जिल्हा परिषदेत शाळांत विद्यार्थ्यांची पटसंख्या पुरेशी आहे. मात्र जिल्ह्यातील दुर्गम भागातील तालुक्यात ही संख्या सर्वाधिक आहे.
राज्य शासनाने पटसंख्या कमी असलेल्या शाळांची माहिती मागविली आहे. त्यानुसार ही सर्व माहिती शालेय शिक्षण विभागाला देण्यात आली आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती एकत्रित करण्याच्या सूचना गटशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्याची कार्यवाही सुरू आहे.
-संध्या गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद