रेडा – राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित आढावा बैठक राज्यमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट “अ’ आणि “ब’ संवर्गासाठी, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी काही गट “क ‘मधील पदांसाठी तसेच बृहन्मुंबईतील लपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया राबण्यिात येते. एमपीएससीच्या माध्यमातून केंद्रीकृत पद्धतीने एकाच वेळी या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
त्या अनुषंगाने प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला लिपिक संवर्गासाठी एमपीएससीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक तसेच शारीरिक त्रास वाचू शकेल, अशीही माहिती भरणे यांनी दिली. तसेच बैठकीमध्ये एमपीएससी मुख्यालयाच्या बेलापूर येथील प्रस्तावित इमारत उभारणीबाबतही चर्चा करण्यात आली. लवकरच या इमारतीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.