पुणे जिल्हा: व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

आळंदीत विवाह मुहूर्ताच्या बुकिंगसाठी थंड प्रतिसाद

आळंदी  -करोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लग्न समारंभांवर बंदी आली. मंगलकार्यालयांचे धंदे बसले आणि वधूवरांनाही लग्नासाठी तब्बल आठ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. मात्र, आता परंपरेनुसार तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर लग्नाचे बुकिंग सुरू झाले. 

मात्र, नोव्हेंबरमध्ये केवळ दोनच तारखा आणि डिसेंबरमध्ये कार्तिकी वारीमुळे लग्नासाठी मंगल कार्यालयांच्या बुकिंगला आळंदीत थंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लग्न समारंभ व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. 

करोनाची दुसरी लाट येण्याची धास्ती विवाहेच्छुक आणि कार्यालय मालकांच्या मनात कायम आहे. अवघ्या पन्नास शंभर लोकांमध्ये मर्यादित स्वरूपात लग्न करण्याकडे कल वाढला आहे. आळंदी आणि लग्नकार्य हे आता समीकरण झाल्याने लग्नाची आळंदी अशीच ओळख आहे. मार्चमध्ये लॉकडाऊन घोषित केले. त्यानंतर मंगल कार्यालये बंद झाली. परिणामी गेल्या आठ महिन्यांपासून लग्नसोहळे पार पडले नाहीत.

मार्च, एप्रिल, मे, जून हा लग्नांचा हंगाम असूनही कमाई सोडा कार्यालयाचे भाडेही अंगावर आले. भटजींसह, आचारी, वाढपी, डेकोरेशनवाले बेकार झाले. काहींनी लग्ने घेतली. मात्र, दिर्घकाळच्या लॉकडाऊमुळे पुन्हा बुकिंगचे पैसे परत करावे लागले. आत लॉकडाऊन शिथिल झाल्याने मंगल कार्यालय मालक हायसे झाले. विवाहच्छुकांचा लग्नासाठीचा विलंब टळला. मात्र, घरगुती पद्धतीने लग्न करण्याचा कल वाढला. अनेकांनी तुळशी विवाहानंतरच्या तारखा धरल्या आहेत.

मंगल कार्यालय मालक गिरीश तुर्की आणि संदीप कुलकर्णी यांनी सांगितले की, तुळशी विवाहास 25 नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे, दोनच लग्नतिथी आहेत. डिसेंबरमध्ये आठ ते 14 पर्यंत कार्तिकी वारी असल्याने लग्ने नाहीत. कार्तिकी वारीनंतर चार, पाच मुहूर्त आहेत. पौष महिन्यात मुहूर्त आहेत, मात्र काही लोक लग्न लावत नाहीत. तरीही काहींनी प्रथा बाजूला ठेवून व्यवहारवाद स्वीकारला. आता थांबलो तर पुन्हा लॉकडाऊनमुळे विवाहास प्रतीक्षा करावी लागेल, या भीतीने जानेवारीतही बुकिंग केले आहे.

 दरम्यान, जानेवारी सात, फेब्रुवारीत अकरा मुहूर्त आहेत. मात्र हे गौण मुहूर्त आहेत. त्यानंतर करोनाची साथ ओसरली तर मार्च महिन्यापासून मंगल कार्यालयांना बुकिंगला प्रतिसाद मिळेल. सध्या कार्यालयांची संख्या वाढल्याने स्पर्धा वाढली. परिणामी कमी खर्चात विवाह सोहळा आळंदीत लावली जातात. सध्या तरी करोनाचे सावट कायम आहे. मोठ्या लग्नांपेक्षा कमी लोकांत लग्न लावून खर्चही कमी प्रमाणात करत असल्याचे चित्र आहे.

वाढपी, आचारी कंपनीत कामाला
अनेक तरूण रोजगार नसल्याने लग्न समारंभ व्यवसायात उतरले आहेत. घरगुती स्वरूपात अनेक लोक लग्न लावत आहेत. थाटमाट, डामडौल टाळून मर्यादित स्वरूपात, कमी खर्चात लग्न लावण्याचा सध्या कल वाढला आहे. रजिस्टर पद्धतीने लग्नांची संख्या वाढली. त्यामुळे वाढपी, आचारी, बॅण्डवाले, मंडप डेकोरेटर यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. अनेक वाढपी महिला-पुरूष चाकणला कंपनीत काम करत आहेत, असे ऋषिकेश डहाके व आकाश जोशी यांनी सांगितले.

तुळशी विवाह सुरुवात 26 ते 30 नोव्हेंबर
1) नोव्हेंबरमधे मुहूर्त……27, 30
2) डिसेंबरमधे मुहूर्त…….7, 8, 9, 17, 19, 23, 24, 27.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.