पुणे जिल्हा: इमु, डेमू रेल्वे सेवेत अनलॉकनंतरही अडथळे

पुणे  – रेल्वेने मोठ्या दिमाखात सुरू केलेली पुणे-दौंड मार्गावरील इमु (इलक्‍ट्रिकल मल्टिपल युनिट) व डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) सेवा अगोदरच रामभरोसे असताना आता लॉकडाऊन, करोना अशा कारणांतून ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह आहेत. त्यातच या मार्गावरील तीन स्थानकांची उंची वाढविण्याचे अद्यापही पूर्ण झाले नाही. अनलॉकनंतर ही सेवा तातडीने सुरू होईल, अशी आशा असताना याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने प्रशासनाच्या उदासिनतेबाबत प्रवाशांत संताप आहे. 

पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम होऊनही इमु अद्यापही पूर्ण क्षमतेने धावू शकली नाही. डेमूचीही सेवा संथगतीने सुरू होती. अनलॉकनंतर या सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होतील, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. परंतु, याबाबत कोणताही निर्णय प्रशासन घेत नसल्याने प्रवाशांत कमालीची नाराजी आहे. याशिवाय मांजरी, खुटबाव व कडेठाण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. निधी येऊनही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या कामात वारंवार व्यत्यय येत असताना त्यात लॉकडाऊनची भर पडली होती.

आता, अनलॉकनंतर या कामांना वेग येईल, अशी अपेक्षा असताना या प्लॅटफॉर्मची बहुतांशी कामे रेंगाळली आहेत. खुटबाव येथील एका बाजूच्या प्लॅटफॉर्मचे काम झाले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी येथील कामही अपूर्णच असल्याचे दिसते. याशिवाय जुना प्लॅटफॉर्म उखडलेला प्रतिक्षा शेड व त्यातील आसने तुटलेली. दोन्ही बाजूच्या प्लॅटफॉर्मवर राडारोडा पडलेला, असे चित्र अद्यापही येथे दिसते.

रेल्वेकडून हजारो प्रवासी वेठीस…
2007 मध्ये विद्युतीकरणाच्या माध्यमातून लोकल सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले. ते पूर्ण होण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, नियोजनशून्य कारभारमुळे ही सेवाही पूर्ण क्षमतेने देण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलेले नाही.

पुणे ते दौंड या सुमारे 74 किलोमीटर अंतरात असलेली रेल्वेस्थानके अपुरी आहेत. या मार्गावरून दररोज 20 हजारांच्या असपास प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामध्ये विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, कामगार, नोकरदार मोठ्या संख्येने दैनंदिन प्रवास करतात. सध्या, रेल्वेची कोणतीच सेवा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने हजारो प्रवासी वेठीस धरले जात आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.