आळंदी शाखेतील प्रकार : बॅंकेच्या मुख्यालयासमोर उपोषणाचा इशारा
आळंदी – आळंदी देवाची (ता. खेड) येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये ग्राहकांच्या तक्रारी वाढतच चालल्या आहेत. ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण होण्याऐवजी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहे. तर वरिष्ठ अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. आळंदी शाखा व्यवस्थापकाने कर्जाच्या अस्सल कागदपत्रांशी छेडछाड करून ग्राहकांस कायद्याची भीती दाखवत नोटीस पाठवून संबंध नसलेल्या कर्जाची रक्कम भरण्यासाठी ससेमिरा लावल्याने शेवटी वैतागुन ग्राहक स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांविरोधात तक्रार अर्ज देण्यास तयार झाला आहे.
तक्रारदार मनोज भळगट यांनी म्हणाले की, हरिभाऊ अकोलकर यांनी 2016 रोजी मुद्रा लोन (कर्ज) घेतले होते.त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने ते कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. या कर्जफेडीसाठी जेव्हा मनोज भळगट यांना कर्जास जामीनदार म्हणून नोटीस आल्यानंतर त्यांनी बॅंकेकडे विचारणा केली असता व्यवस्थापकांनी त्यांना कागदपत्रे दाखवली; परंतु मनोज भळगट यांनी सांगितले की या कागदपत्रावर माझे हस्ताक्षर नाही आणि याचा माझ्याशी काही संबंधही नाही.
ही कागदपत्रे खोटी आहेत वरील सह्या खोडलेल्या असल्याचे आढळून आले. ही कागदपत्रे बघून मनोज भळगट यांना जामीनदार करून कर्जदारास सवलत दिली आहे असे बॅंकेचे व्यवस्थापक संतोष पवार यांनी सांगितले. मनोज भळगट यांनी स्वत:चे सिबिल तपासले असता बॅंकेने कर्ज मनोज भळगट यांना दिले, असे दिसून आले. मनोज भळगट यांनी संतोष पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले ही खोटी केस संतोष मोरे आणि तत्कालिन व्यवस्थापक भीमा गाडेकर यांनी केलेली आहे.
हा प्रकार बॅंकेचे झोनल व्यवस्थापक गोयल, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक वाघमारे यांना मनोज भळगट यांनी प्रत्यक्ष भेटून सांगितला; परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे भळगट यांचे म्हणणे आहे. दरम्यान, न्याय न मिळाल्यास बॅंकेच्या मुख्यालयासमोर कुटुंबासह उपोषणाला बसणार असल्याचे तक्रारदार मनोज भळगट यांनी सांगितले.