झेंडे बंधूंचा जरबेरा शेतीचा प्रयोग दिवे येथे यशस्वी
बेलसर – दिवे (ता. पुरंदर) गावांमधील सचिन झेंडे आणि राहुल झेंडे या दोन्ही भावांनी जरबेरा पिकामध्ये नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांची पॉलीहाउस शेती परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये जरबेरा या फुलाचे उत्पन्न घेऊन अधिकचा नफा मिळवला आहे.
सचिन झेंडे यांनी 2013 मध्ये 10 गुंठ्यापासून सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात कार्नेशन या फुलाचे उत्पादन घेतले. तर आता काळाची पावले ओळखत आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन जरबेरा पिकाची लागवड करून त्याचे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. जरबेराची लागवड करताना मांजरी येथून रोपे मागवण्यात आली. एका रोपाची किंमत ही 35 रुपये इतकी आहे.
10 गुंठ्यांमध्ये सहा हजार रोपांची लागवड केली जाते. सद्यस्थितीला 20 गुंठेक्षेत्रावर जरबेराची लागवड केली आहे. एक गड्डी ही 50 ते 60 रुपयांना विकली जाते. एका गड्डीत 10 फुले असतात सद्यस्थितीत 350 ते 40 गड्डी सापडत आहे. झेंडे यांचे 30 गुंठ्यांमध्ये पॉलिहाऊस आहे. पॉलीहाउस म्हणजे नियंत्रित वातावरणात शेती करणे होय, त्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि मार्गदर्शन असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिवे गावातील शंकर काळे, मोहन झेंडे, प्रमोद टिळेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना लाभत आहे.
सध्या पुणे या ठिकाणी जरबेरा फुले विक्रीसाठी पाठविला जात आहे तेथून हैदराबाद, बडोदा, अहमदाबाद आणि मुंबई या ठिकाणी विक्रीसाठी पाठविला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रासायनिक खताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेती करणे जिकरीचे होऊन बसले आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून जैविक सेंद्रिय खतांचा ही वापर केला जात आहे. त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.
झेंडे कुटुंबच शेतात राबते
सद्यःस्थितीत बाजारात जरबेरा फुलांची मागणी वाढली आहे. सचिन झेंडे यांना शेतीत त्यांची पत्नी आई भाऊ आणि वहिनी यांची मोलाची साथ मिळत असून, त्यांच्या कुटुंबातील लहान मुलेदेखील पॅकिंग करण्यासाठी मदत करतात. एकंदरीत अख्खे कुटुंबच त्यांना शेतीत मदत करते.