समर्थकांनी मुख्य रस्ता अडवला : उद्या इंदापूर बंदची हाक
इंदापूर – शहरातील ओबीसी महाएल्गार मेळावा पार पडताच, आमदार गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याच्या इंदापूर तहसील कार्यालयाजवळ सुरू असणार्या उपोषणाला भेट देण्यासाठी जात असताना अचानक त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावण्यात आलीत शेजारीच मराठा बांधवांचे साखळी उपोषण सुरू होते.
या ठिकाणी घोषणाबाजी झाली; मात्र पोलिसांनी वेळीच आवर घातल्याने अनर्थ टळाला. दरम्यान, सोमवारी (दि. 11) इंदापूर बंदचे आवाहन ओबसी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे, तसे निवेदन इंदापूर पोलिसांना देण्यात आले आहे.
इंदापूरात गेल्या 47 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.या उपोषणा शेजारीच दुधाला दरवाढ मिळण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे या उपोषणाला भेट देण्यासाठी आमदार पडळकर सभा संपल्यानंतर जात होते. या दरम्यान मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी पडळकर ‘गो बॅक’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.
यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पडळकर त्यांच्या दिशेने अंगावर चपला फेकल्याचा देखील प्रकार घडला आहे.
या घटनेनंतर काही वेळातच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी येथील मुख्य रस्ता आडवत रस्ता रोको आंदोलन केले तसेच चप्पल फेक करणार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा धनगर ओबीसी बांधवांकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.