मंचर -आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी दुर्गम भागातील न्हावेड येथे गावातील युवक विद्यार्थ्यांना “आमची शाळा बंद; पण शिक्षण चालू’ उपक्रमांतर्गत मोफत शिक्षण देत आहे. न्हावेड (ता. आंबेगाव) येथे तरुणांनी नियोजन केले आणि सुरुवातीस या गावातील एका व्यक्तीच्या घरात शाळा-अभ्यास वर्ग सुरू केला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च पासून महाराष्ट्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी बंद आहेत. सरकारमार्फत ऑनलाइन शिक्षण कार्याची घोषणा होऊन कार्यप्रणाली सुरू झाली. मात्र या प्रणालीचा फायदा व अंमलबजावणी ग्रामीण भागात प्राकृतिक व अनेक सुविधांच्या अभावामुळे फारशी प्रभावीपणे राबविली जाऊ शकत नाही.
मुलांमधील अभ्यास करण्याच्या सवयींमध्ये सातत्य राहून अभ्यासाची सवय सक्रीय व निरंतर जोपासली जावी, या उद्देशांने न्हावेड गावातील सुशिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींनी गावातील ग्रामस्थ, पालक आणि गावातील पण नोकरीनिमित्त शहरी भागामध्ये असणारे नोकरदार वर्ग यांच्या सहकार्यातून “आमच्या गावातील आमची शाळा बंद; पण शिक्षण सुरू’ उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
या भागात 3 जूनच्या चक्रीवादळामुळे गावातील शाळा व सार्वजनिक समाज मंदिर या इमारतींचे पत्रे उडून गेले आणि बांधकामपण काही अंशी खचले आहे. जून व जुलै महिन्यात पावसाचे जास्त प्रमाण, विजेचा नेहमीच अनियमित पुरवठा अशा अनेक समस्या युवकांच्या समोर होत्या. मात्र, गावातील तरुणांनी योग्य नियोजन केले.सुरुवातीस त्या गावातील एका व्यक्तीच्या घरात शाळा-अभ्यास वर्ग सुरू केला.
स्पर्धा परीक्षांवर भर
9 ऑगस्ट पासून गावातील 20 ते 22 वर्षांपूर्वीच्या अतिशय जीर्ण सार्वजनिक समाज मंदिर इमारतीमध्ये अभ्यासवर्गाचे कार्य चालू आहे. शाळेमध्ये पहिले ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मूलभूत अध्यापन केले जाते आहे. इयत्ता, वेळ, विषय, अध्यापक करणारे घटक यांचे नियोजन करून वेळापत्रक तयार करून अध्यापन केले जात आहे. रविवारी स्पर्धा परीक्षा उपयुक्त सामान्य ज्ञान या विषयावर चर्चासत्र घेतली जातात. शाळेतील शिक्षकांचेही सहकार्य आहे. काही आधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.