पिंपरी : अडीचशे करोनाबाधित महिलांची सुखरुप प्रसूति

  • करोनाच्या काळात “वायसीएम’मध्ये 1329 महिलांची प्रसूति
  • अवघ्या चार नवजात शिशुंना लागण
  • कोविड समर्पित “वायसीएम’ची उत्कृष्ट कामगिरी

-प्रकाश गायकर
पिंपरी – गेल्या सात महिन्यांमध्ये नवजात शिशुंपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये गर्भवती महिलांचाही समावेश आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये अडीचशेहून अधिक गर्भवती महिलांना करोनाची लागण झाली. बाधित महिलांकडून चार नवजात शिशुंना लागण झाली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वायसीएम रुग्णालय पूर्णपणे कोविड समर्पित होते. परंतु या रुग्णालयातील बालरोग आणि प्रसुती विभागाने करोनाच्या भीषण काळात उत्कृष्ट कामगिरी करत तेराशेहून अधिक महिलांची प्रसुती केली. त्यापैकी 255 महिलांना लागण झाली होती. त्या सर्वांवर योग्य उपचार करत आई आणि बाळांना सुखरुप घरी पाठविले. विशेष म्हणजे बाधित महिलांच्या प्रसुतीमध्ये सिजेरियनचे प्रमाण कमी आहे.

करोनाकाळात शहरातील गर्भवती महिलांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे वायसीएम रुग्णालय वरदान ठरले आहे. शहरामध्ये करोना संक्रमणाची धास्ती असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये प्रसुतीसाठी प्रवेश नाकारला जात होता. करोना संशयित असलेल्या महिलांना प्रसुतीसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले जात होते. याठिकाणी मार्च ते स्पटेंबर या सात महिन्याच्या काळात 1329 महिलांची प्रसुती झाली. त्यापैकी 1074 महिला या करोनाच्या संशयित म्हणून दाखल केल्या होत्या. त्यापैकी सात महिन्याचा कालावधीत 255 करोनाबाधित महिलांची सुखरुप प्रसुती झाली.

मार्च महिन्यामध्ये वायसीएम रुग्णालयामध्ये 750 महिलांची प्रसुती झाली. या सर्व महिला संशयित म्हणून दाखल केल्या असल्याची नोंद रुग्णालय प्रशासनाकडे आहे. त्यापैकी मार्च महिन्यामध्ये एकही बाधित महिला आढळली नाही. मे महिन्यामध्ये पहिल्यांदा गर्भवती महिला करोनाबाधित आढळली. या महिन्यात वायसीएमममध्ये 50 प्रसुती झाल्या. त्यापैकी 49 महिला या संशयित म्हणून दाखल झाल्या होत्या. सर्वाधिक गर्भवती महिला ऑगस्ट महिन्यामध्ये दाखल झाल्या. एकूण 133 महिलांची प्रसुती झाली. विशेष म्हणजे यापैकी फक्त 7 महिला संशयित म्हणून दाखल केल्या होत्या. परंतु 126 महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्या सर्वांची सुखरुप प्रसुती करण्यात आली.

शहरामध्ये स्पटेंबर महिन्यांपर्यंत वायसीएम रुग्णालयामध्ये 255 करोनाबाधित महिलांची प्रसुती झाली. त्यापैकी 2 नवजात शिशुंना करोनाची लागण झाली होती. तर बाहेरच्या रुग्णालयामध्ये प्रसुती झालेल्या महिलांचे दोन नवजात शिशुही उपचारासाठी दाखल झाले होते. म्हणजेच करोनाच्या काळामध्ये फक्त चार नवजात शिशुंना करोनाची लागण झाली होती.

करोनाच्या काळामध्ये चार नवजात शिशुंना वायसीएमच्या बालरुग्ण विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोन बाळ बाहेरील रुग्णालयातून रेफर करण्यात आले होते. तर दोन बाळ वायसीएम रुग्णालयामध्येच प्रसुती झालेल्या मातांचे होते. काही दिवस त्यांच्यावर यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. चारही बाळे आता सुखरुप आहेत. करोनाच्या काळामध्ये वायसीएम रुग्णालयामधील सर्वच डॉक्‍टरांनी चांगली कामगिरी केली. त्यामध्ये प्रसुती विभागाच्या डॉक्‍टरांनीही शर्तीचे प्रयत्न करत सर्व महिलांची सुखरुप प्रसुती केली.
– डॉ. दीपाली अंबिके, बालरोगत तज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय

सात महिन्यामध्ये तेराशे प्रसुती वायसीएम रुग्णालयात झाल्या. त्यापैकी 255 महिलांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. तसेच सर्व महिलांची सुखरुप प्रसुती करण्यात आली. बाधित महिलांपैकी 30 टक्के महिलांचे सिझर करावे लागले. बाकी महिलांची नॉर्मल प्रसूत झाली.
– डॉ. असाळकर, प्रसूति विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.