विद्यार्थ्यांनी बनविलेला स्मार्ट बेंच राज्य पातळीवर झळकणार
शिक्रापूर – सणसवाडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्मार्ट बेंचमध्ये तृतीय, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविले. विद्यालय जिल्ह्यात अव्वल ठरले असून विद्यार्थ्यांचा स्मार्ट बेंच राज्य पातळीवर झळकणार आहे.
मावळमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनात आयोजित केले होते. यात सागर हरगुडे व दिव्या राजेंद्र पवळ या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्मार्ट बेंचमुळे दप्तराचे ओझे कमी होईल, डिजीटल पाटी उपलब्ध झाल्याने वह्यांच्या पानांची बचत होणार असून उंचीनुसार बेंच खालीवर करण्याची सुविधा,
कचरा टाकण्यासाठी वेगळा कप्पा, डबा, रेनकोट, प्रथमोपचार साहित्य,खेळाचे साहित्य, दररोज लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी रचना केली केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विशेष आकर्षित करणारा बेंच ठरला आहे.
प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 13 संघांमधून सार्थक वांढेकर, भाग्यश्री काळे व अनुश्री दरेकर यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. यशस्वी विदयार्थ्यांचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे, गुलाबराव म्हाळसकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, संध्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे, सरपंच रुपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, पंचायत समितीच्या माजी सभापती मोनिका हरगुडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा नूतन हरगुडे, सारिका हरगुडे, विद्यालयाच्या प्राचार्या राधिका मेंगवडे, पर्यवेक्षक गौतम देवकर यांनी अभिनंदन केले.