पुणे – गुंड शरद मोहोळचा खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याची पुणे पोलिसांनी पुनावळे भागात धिंड काढली. तर रामदास मारणे याची मुळशी भागात धिंड काढली. या कारवाईमुळे मुळशी तालुक्यातील गुंडांना जरब बसणार आहे. यावेळी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आदी उपस्थित होते.
विठ्ठल शेलारसह साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, रामदास मारणे यांच्यासह १५ जणांना शरद मोहोळचा खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. विठ्ठल शेलार, गणेश मारणे हे या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तर दुसरीकडे विठ्ठल शेलारची बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. ही स्कॉर्पिओ पुनावळे येथील एक फार्महाऊस वर होती. मात्र, पोलीस ही गाडी जप्त करतील या भीतीने ती दुसरीकडे घेऊन जात होता. मात्र, गुन्हे शाखेने तिचा माग काढला. पोलीस मागावर असल्याचे पाहून त्याने बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ रस्त्याच्या काढेला लावून पळ काढला.
विठ्ठल शेलारची क्रेटा जप्त करण्यासाठी पोलीस गेले असता त्यांना बुलेटप्रूफ गाडी संदर्भात माहिती मिळाली होती. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात फॉर्च्युनरसह एकूण ६ महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत.