प्रशांत काळभोर यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
सुस्थितीतील पत्र्याचे शेड पाडल्याने सरकारी मालमत्तेचे नुकसान होणार
लोणी काळभोर – येथील आठवडे बाजारातील पत्रा शेड पाडून तेथे व्यावसायिक गाळे बांधण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवानगी न घेता तसे केल्यास रस्त्यावर उतरण्याबरोबरच वरील निर्णयाविरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व हवेली तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत काळभोर यांनी दिला आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील आठवडे बाजारातील पत्रा शेड पाडून, त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात लोणी काळभोर येथील शिवसेना कार्यालयात प्रशांत काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी प्रशांत काळभोर यांच्या समवेत साधना सहकारी बॅंकेचे संचालक प्रताप बोरकर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काळभोर, ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य राहुल काळभोर, सुनील गायकवाड, पांडुरंग केसकर, नितीन जगताप, माऊली काळभोर आदी उपस्थित होते.
प्रशांत काळभोर म्हणाले, लोणी काळभोर ग्रामपंचायतीने मनमानी कारभार करून सुस्थितीत असलेले आठवडा बाजार शेड मधील रस्त्याच्या कडेचा भाग पाडून त्या ठिकाणी व्यापारी गाळे बांधण्याचे नियोजन केले आहे. ही जागा आठवडे बाजारासाठी राखीव असून सध्याच्या बाजारास अपुरी पडत आहे. त्यामुळे ते बांधकाम पाडणे चुकीचे आहे. सुस्थितीत असलेले पत्र्याचे शेड पाडल्याने सरकारी मालमत्तेचे नुकसान होणार आहे.
बाजारात येणारे शेतकरी, ग्राहक, व्यापारी व विक्रेते यांच्यासाठी पाच वर्षापुर्वी लोणी काळभोर आठवडे बाजारात सुमारे 50 लाख रुपये निधी खर्चून पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. या पत्रा शेडचे आयुष्य किमान 25 वर्षे असतांना, ग्रामपंचायतीचे सत्ताधारी कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवानगी न घेता व स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मनमानी कारभार करीत असतील तर अशा निर्णयांना आमचा विरोध राहणार आहे.
आठवडे बाजारातील पत्रा शेड पाडून व्यावसायिक गाळे बांधण्यास ग्रामपंचायत सदस्य बकुळा केसकर, सविता जगताप, राहुल काळभोर व सुनील गायकवाड या चार विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध दर्शविला आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी व बेकायदा व्यावसायिक गाळे उभारण्यासाठी विरोध म्हणून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
ग्रामसभेत आठवडे बाजारात सुधारणा करण्याबाबत सखोल चर्चा झाली आहे. आठवडे बाजाराच्या उर्वरित जागेवर पत्राशेड, नागरिकांना पिण्याचे पाणी, शौचालये, सीमाभिंत आदी सुविधा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या सर्व सोयी व तेथील रस्ता मोठा करण्यासाठी लागणारा खर्च शेतकऱ्यांसाठी गाळे बांधून उभा करण्यास ग्रामसभेत ग्रामस्थांनी मंजूरी दिली आहे. दोनशे पेक्षा जास्त ग्रामस्थांनी गाळे मागणीसाठी अर्ज दिले आहेत. ग्रामस्थांकडून विविध सूचना आल्या असून याबाबतचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. सध्या जैसे थे परिस्थिती असून ग्रामस्थांच्या आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल.
– योगेश काळभोर, सरपंच, लोणी काळभोर