पुणे – युरोपियन स्पेस एजन्सीने मंगळ ग्रहाच्या दक्षिण ध्रुवाजवळ जमिनीखाली एक खाऱ्या पाण्याचा जिवंत साठा असल्याचा दावा केला आहे. संस्थेतर्फे रडारच्या माध्यमातून मिळालेल्या संकेताच्या आधारावर हा दावा करण्यात आला आहे.
मंगळ ग्रहावर जीवसृष्टीच्या शक्यतेबाबत गेली अनेक वर्षे संशोधन केले जात आहे. अनेक देशांमधील शास्त्रज्ञ या संशोधनात सहभागी असून, विविध संशोधन संस्थांच्या माध्यमातून मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास केला जात आहे.
याच प्रयत्नाचा भाग म्हणून युरोपियन स्पेस एजन्सीतर्फे मंगळाच्या कक्षेत एक अंतराळयान पाठविण्यात आले असून, या यानावरील रडारच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मंगळ ग्रहाच्या दक्षिण ध्रुवाजवळ खाऱ्या पाण्याचा एक मोठा साठा जमिनीखाली अस्तित्वात असल्याचे निष्कर्ष संशोधकांनी मांडला आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीखाली असलेल्या या साठाचा आकार तब्बल 75,000 चौरस किलोमीटर इतका आहे. म्हणजेच जर्मनी देशाच्या एक पंचमांश भाग इतका या जलस्रोताचा आकार आहे. मंगळावरील थंड तापमानाध्येही पाणी गोठलेले नाही याचा अर्थ ते पाणी अधिक खारट असण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2018 मध्ये देखील याच भागात पाण्याचा साठा असल्याचे संकेत मिळाले होते. ही शक्यता खरी ठरल्यास मंगळावरील पाण्याचा जिवंत साठ्याचा पहिला स्रोत ठरेल आणि यातून त्याठिकाणी जीवसृष्टीच्या शक्यतेबाबत अधिक खुलासे होण्याची शक्यता शास्रज्ञांनी वर्तविली आहे.
मंगळ ग्रह हा एकेकाळी उष्ण ग्रह होता आणि पृथ्वीप्रमानेच याठिकाणी देखील जीवसृष्टी अस्तित्वात होती. मंगळावरचे आजचे वातावरणात पाहता, भूपृष्ठावर जलस्रोतांचे अस्तित्व असणे शक्य नसले तरी, ग्रहावरील प्राचीनकालीन जलस्रोते जमिनीअंतर्गत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.