– रोटेरिअन डॉ. मीना बोराटे यांचे प्रतिपादन.
भोर – भोर येथील प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित तिळगुळ वाटप समारंभात प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण रक्षणाचे काम समाजाला प्रेरणा देणारे असून याचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत रोटेरिअन डॉ. मीना बोराटे यांनी व्यक्त करुन प्रेरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अॅड. जयश्री शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी सनदी लेखापाल परीक्षेत प्रथम प्रयत्नातच यश संपादन केलेल्या नाटंबी ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्षदा खोपडे यांचा माता चंद्रभागा खोपडे तसेच महिला लघुउद्योजिका कविता जोशी यांचा सत्कार करण्यात आला. तर आपली शेतजमीन विकून मुलगी तृप्ती हिची शासकीय अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे मानसिंग बांदल आणि सुरेखा बांदल यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी पर्यावरण रक्षण आणि मुलींच्या संगोपनाचा संदेश छापलेल्या कापडी पिशव्यांचे महिलांना वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अॅड. जयश्री शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ अरुंधती सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. तर, अनिता धुमाळ यांनी आभार मानले.
यावेळी भोरच्या प्रथम महिला नगराध्यक्षा गीतांजली शेटे, रोट. नंदा जाधव, माजी नगरसेविका राजश्री रावळ, वृषाली घोरपडे, शुभांगी पवार, डॉ. रूपाली म्हेत्रे, पल्लवी सोनवणे, पोलीस पाटील शर्मिला खोपडे,विजया शिंदे, अनिता फडणीस, जनाबाई पालकर, युगंधरा दरेकर, सविता मोरे यासह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.