जनतेचा सक्रिय सहभाग : खासदार सुळेंचा देशातील पहिलाच अभिनव उपक्रम
जळोची – समाजातील शेवटच्या माणसाचा आवाज देखील संसदीय प्रणालीत बुलंद झाला तरच लोकशाही व्यवस्था चिरंतन राहू शकते. त्यामुळे नागरिकांचे मुद्दे लोकसभेत मांडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी “सक्रिय सहभाग आणि संवाद: लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी’ या देशातील पहिल्या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत नागरिकांना आपल्या समस्या किंवा सूचना सुळे यांच्यांपर्यंत फक्त एका क्लिकवर पोहोचवता येणार आहेत.
खासदार सुळे यांनी लोकसभेत राज्यातील व देशातील अनेक जनहिताच्या विषयांवर आवाज उठवला आहे. त्यांच्यी लोकसभेतील कामगिरी नेहमीच अव्वल असते. त्यामुळे त्यांना संसदरत्न पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. यापुढेही जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडताना जनतेचा सहभाग आणखी वाढावा यासाठी त्यांनी सक्रिय सहभाग आणि संवाद’ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.
या अंतर्गत नागरिक प्रश्न, विषय, सूचना ‘आस्क मी डॉट सुप्रिया सुळे डॉट नेट’ (https://askme.supriyasule.net) या वेबसाइटवरुन थेट पाठवू शकतात. वेबसाइट ओपन केल्यानंतर नागरिकांना एक फॉर्म भरावा लागेल. फॉर्ममध्ये माहिती आणि प्रश्न सविस्तर लिहिल्यानंतर प्रश्न पाठवता येणार आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी राजकारण आणि समाजकारण करीत आहे. त्यामुळे संवादावर माझा विश्वास आहे. जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्यासाठी आपल्याला जनता निवडून देत असते. मला ही संधी दिल्याबद्दल मी बारामती मतदारसंघातील जनतेची ऋणी आहे. नागरिकांनी आपले प्रश्न मांडावेत शिवाय या संवादाला आणखी मजबूत करण्यासाठी नागरिकांच्या अन्य काही सूचना असतील तर त्यांचेही स्वागत आहे. केंद्र सरकारच्या काही धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली आहे. अर्थव्यवस्था संकटात आहे. एका कठीण काळातून आपण जात आहोत. जनतेची प्रतिनिधी या नात्याने संसदेत या विषयावर देखील आपण नक्की आवाज उठवू.
-सुप्रिया सुळे, खासदार बारामती.