ज्ञानेश्वर फड/ प्रीतम पुरोहित
वेळापूर – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चार लाखांवर भाविक सहभागी झाले आहेत. या सोहळ्यात बहुतांश वारकरी ग्रामीण भागातील असतात. यातील अनेक पुरुष, महिला हे विडी, तंबाखू, मिश्री तर काही पुरुष अमली पदार्थांचे सेवन करतात. मात्र वारी सोहळ्यात सहभागी झालेला व्यसनमुक्त युवक संघ व्यसनी वारकऱ्यांना व्यसनमुक्त करण्याचे मोलाचे कार्य करत आहे. आळंदी ते वेळापूर अशा या 15 दिवसांत तब्बल दोन हजार वारकऱ्यांनी व्यसन सोडले असून, माऊलींची शपथ घेऊन यापुढे व्यसन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाची सुरूवात 20 वर्षांपूर्वी झाली. प्रत्येक वर्षी वारी काळात 5000 जणांना व्यसनमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. व्यसन सोडलेले पुढील वर्षी वारीत आल्यावर आवर्जून भेट देतात. व्यसन सोडण्याचा संकल्प केलेल्यांपैकी 50 टक्के लोक हे पुन्हा व्यसन करतात, मात्र बाकीचे लोक व्यसन सोडतातच. व्यसनमुक्त युवा संघटनेचे राज्यभरात सात हजारांहून अधिक सदस्य कार्य करतात. यातील बहुतांश हे वारी काळात व्यसन सोडलेले आहेत.
ते आता इतरांचे व्यसन सोडविण्यासाठी प्रयत्न करताहेत. व्यसनामुळे आर्थिक हानीसह शरीराची हानी होते. व्यसनामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला बळी पडून अवेळी मृत्यू येतो. त्यामुळे संसाराची राखरांगोळी होते. हभप बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेतून हे कार्य सुरू आहे. आमच्या प्रयत्नामुळे एखाद्याचा जीव, संसार वाचतो याचा खूप आनंद आहे.गोळा झालेले सर्व व्यसन साहित्य गोण्यांमध्ये भरून निर्जन स्थळी त्याची होळी केली जाते, असे संघाचे सदस्य डॉ. सुदीप ओहोळ यांनी सांगितले.
असे करतात प्रबोधन…
पालखी सोहळ्यासोबत व्यसनमुक्त युवक संघाची एक व्हॅन असते. व्हॅनवर लाऊडस्पीकर असतो. पालखीचा मुक्काम असतो, त्याठिकाणी ही व्हॅन उभी करून व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम सांगितले जातात. “व्यसन सोडा, संसार जोडा’ यांसारख्या घोषणा दिल्या जातात. वारीत सकारात्मक वातावरण असल्यामुळे आणि सतत ते शब्द कानावर पडत असल्याने मतपरिवर्तन होऊन वारकरी व्यसन सोडण्यास तयार होतात. स्वतःहून व्हॅनजवळ येऊन व्यसन करत असलेले साहित्य बॉक्समद्ये टाकले जाते. यावेळी त्यांना यापुढे व्यसन करणार नाही अशी शपथ दिली जाते.
मित्रांच्या संगतीने दारू पीत होतो. आठवड्यातून दोन तीन दिवस दारू प्यायचो. माझी दोन एकर जमीन आहे. दारुमुळे आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. तसेच शेजाऱ्यांसोबत भांडणे होत होती. त्यामुळे मी दारू सोडण्यासाठीच वारीला आलो होतो. याठिकाणी हा उपक्रम दिसला. येथे मी माऊलींची शपथ घेऊन दारू सोडण्याचा संकल्प केला असून, यापुढे कधीच दारूला हातही लावणार नाही.
– माधव राजेगोरे, (वय 60, अर्धापूर, नांदेड)