सासवड ता. पुरंदर : येथे पालखी महामार्गावर शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी पुरंदर काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सासवड – सध्याची दुष्काळी परिस्थिती, कांदा निर्यात बंदी, दूध दर कपात, ऊसापासून इथोनॉल निर्मितीस बंदी, सरसकट कर्जमाफी या आणि यासारख्या शेतकर्यांच्या अनेक विषयावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुरंदर काँग्रेसच्या वतीने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या सुचनेप्रमाणे सोमवारी (दि. 11) सासवड येथे पालखी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या मागण्यांबाबत तहसीलदार पुरंदर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रस्त्यावर दूध ओतून शेतकरी विरोधी केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगताप म्हणाले की, शेतमालाचे पडलेले बाजारभाव, वाढती महागाई, आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी हतबल झालेला असून त्यातच सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी, दूध दर कपात, ऊसापासून इथोनॉल निर्मितीस बंदी यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनता, शेतकर्यांकडे दुर्लक्ष करणार्या, शेतकरी विरोधी, व्यापारी धार्जिन्या केंद्र व राज्य शासनाचा याप्रसंगी निषेध करण्यात आला.
यावेळी सुनिता कोलते, माऊली यादव, चेतन महाजन, भारती गायकवाड, हर्षदा पवार, महादेव टिळेकर, देविदास कामथे, संदीप फडतरे, अशोक निगडे, शाहजान रफिक शेख, देविदास नाझीरकर, विठ्ठल मोकाशी, संभाजी काळाणे, महेंद्र माने, अजित जगताप, यशवंतकाका जगताप, मनोहर जगताप, विजय वढणे, संतोष खोपडे, रोहित इनामके, संतोष गिरमे, संदीप राऊत, संतोष जगताप, पिनू काकडे, विकास कामथे, जितेंद्र मेमाणे, विकास इंदलकर, राहुल जगताप, सुभाष कुतवळ, राजेश काकडे, अॅड. महेश राणे यांसह काँग्रेसच्या विविध विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
केलेल्या मागण्या
पुरंदर तालुक्यात वाढलेले अवैद्य धंदे बंद करा, केंद्र शासनाने बंद केलेली कांदा निर्यात बंदी त्वरीत उठवावी, दुधाला प्रति लिटर 50 रुपये बाजारभाव मिळावा, शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करा, दुष्काळी परिस्थितीमुळे तात्काळ चारा छावण्या सुरू करा, पुरंदर उपसा योजनेमधून टंचाईग्रस्त भागास मोफत तलाव भरा, दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दुष्काळी अनुदान द्या, दिवे ते नीरा-पंढरपूर पालखी मार्ग पवारवाडी ते बोरवकेमळा तसेच पिसुर्टी ते नीरा बायपासचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा.