Ravindra Berde Death: मराठी चित्रपट सृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे. गेली काही वर्षे त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच मंगळवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले. रविंद्र बेर्डे यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. दोघांनीही बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. रविंद्र बेर्डे यांनी वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा चित्रपटात अभिनय केला होता. त्यांनी तीनशेहून अधिक मराठी चित्रपटातून काम केले आहे. तरुण वयात ते नभोवाणीशी जोडले गेले. १९६५ पासून आकाशवाणीवर नभोनाटयांचे दिग्दर्शन करता करता त्यांचा नाट्यसृष्टीशी संबंध आला. १९८७ साली त्यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी आजवर ३१ नाटकांमधून भूमिका केल्या होत्या.
रवींद्र बेर्डे यांनी चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक, हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, गंमत जंमत, झपाटलेला, ‘भुताची शाळा यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले. रवींद्र बेर्डे यांना १९९५ मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर २०११ पासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलं, सुना आणि नातवंडं असं कुटुंब आहे.