उत्तर जिल्ह्याच्या आगारातील स्थिती : बाजारभाव नसल्यानेही बळीराजाने फिरवली पाठ
गंगाराम औटी
राजुरी – कांद्याचा आगर समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांमध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते पण यावर्षी कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.या तालुक्यांमध्ये कांदा लागवडीसाठी लागणारी रोपे मोठ्या प्रमाणात असतात पण सध्या यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे, त्यामुळे पुढे होणारी कांदा लागवड फार कमी प्रमाणात होण्याची भीती आहे.
यावर्षी या तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे या तालुक्यांमध्ये पाणी पातळी घटली आहे. विहिरी, बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही त्यामुळे कांदा लागवडीसाठी पुरेसा पाणी उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याच्या लागवडीत घट झाली आहे. कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संख्या असून सध्या कांद्याचे दर नेहमीच सातत्याने घसरण होत आहे त्यामुळे मागील चार ते पाच वर्षांत कांद्याला शाश्वत बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भागत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा लागवड पाठ फिरवली आहे.
सरकारने नाफेड द्वारे कांदा खरेदी हमीभाव देऊन ही कांदा खरेदी केली जाणार असल्याचे सांगितले पण शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही. नाफेडनेही कांदा खरेदी पुरेपूर प्रमाणात केली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे त्यामुळे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादनावरती झाला आहे.
जुन्नर, आंबेगाव, खेड या सह्याद्रीच्या रांगा असलेल्या पश्चिम भागात धरण क्षेत्रात 92 टक्के पाऊस झाला त्यामुळे धरण क्षेत्रात पाणी आहे; परंतु या तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कमी प्रमाणात झाला तर शिरूर तालुक्यात फारच कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कांदा उत्पादनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी कमी पाण्यावरती येणाऱ्या पिकांकडे वळत आहेत त्यासोबत कालवा, नदी या परिसरात कांदा लागवड काही प्रमाणात होत आहे.
– सतीश शिरसाट, उपविभागीय कृषी अधिकारी, खेड
दरवर्षी 10 एकर कांदा लागवड असते; पण यावर्षी दोन एकर कांदा लागवड केली आहे. यंदा अत्यल्प झालेला पाऊस आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्याचा परिणाम कांदा उत्पादनात होत आहे.
– अनिल पिंगळे, कांदा उत्पादक
बाजारपेठा उपलब्ध मात्र…
उत्तर पुणे जिल्ह्यातील कांदा खरेदीसाठी बाजारपेठ उपलब्ध उपलब्ध आहे अनेक बाजार समित्यांद्वारे कांद्याची खरेदी केली जाते यामध्ये जुन्नर, ओतूर, आळेफाटा, शिरूर, मंचर, चाकण आदी ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ असल्याने कांदा उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात मागील काळात शेतकरी वळत होता पण सध्या कांद्याला उत्पादन खर्च भागत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनाकडे पाठ फिरवली आहे. कांद्यासाठी रोपे शेतकऱ्यांनी यावर्षी फार कमी प्रमाणात केली आहे त्यामुळे त्याचा परिणाम थेट कांदा लागवडीवर होणार आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जुन्नर : 7700, आंबेगाव : 5700, खेड : 6200, शिरूर : 9200, एकूण : 28400 हेक्टर क्षेत्र कांदा लागवड झाली होती. तर यावर्षी आत्तापर्यंत 9000 हेक्टर कांदा लागवड झाली असून सरासरी 30 टक्क्यांपर्यंत ही कांदा लागवड झाली यामध्ये अजून 20 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.